
ज्या निर्दयीपणे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, इतक्या निर्दयीपणे इंग्रजांनीदेखील स्वातंत्र्यसैनिकांना मारहाण केली नसेल, अशी टीका आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपात जनरल डायरने जन्म घेतला असावा असा घणाघातही केजरीवाल यांनी केला.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, काल मोदी सरकारने आपल्या देशातील मुलांवर आणि तरुणांवर ज्या प्रकारे अमानुष अत्याचार केला, तसं दृश्य देशाच्या इतिहासात कधीच पाहायला मिळालं नाही. माझ्या मते, या बाबतीत मोदींनी इंग्रजांनाही मागे टाकलं आहे. इंग्रजांनीदेखील कदाचित स्वातंत्र्यसैनिकांवर इतक्या निर्दयीपणे लाठीचार्ज केला नसेल किंवा असा हल्ला केला नसेल. पण मोदी सरकारने आपल्या देशातील स्वतःच्याच मुलांवर आणि तरुणांवर हल्ला केला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फिरत आहेत. अनेक व्हिडिओंमध्ये मुलं पोलिसांसमोर हात जोडून विनवणी करताना दिसत आहेत. अनेक व्हिडिओंमध्ये मुली पोलिसांसमोर गयावया करत आहेत, हात जोडत आहेत. तरीही पोलीस त्यांना सातत्याने मारहाण करत आहेत. काही व्हिडिओंमध्ये निःशस्त्र मुलांवर कोणत्याही कारणाशिवाय लाठीचार्ज होताना दिसत आहे. मी स्वतः असा एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये दोन-तीन पोलीस उभे होते आणि तिथून जाणाऱ्या प्रत्येक मुलाला लाठ्या मारत होते. ती मुलं काहीच करत नव्हती, कोणावरही हल्ला करत नव्हती. तरीही त्यांच्यावर लाठीचार्ज सुरू होता.
अनेक ठिकाणी लाठीचार्जची कोणतीही गरज नसताना कारवाई करण्यात आली. एका ठिकाणी काही मुलं बसली असताना त्यांच्यावर अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले. कालच्या आंदोलनानंतर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर अनेक पालक लिहित आहेत की, त्यांची मुलं बेपत्ता झाली आहेत. त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन एखाद्या तुरुंगात किंवा इतरत्र नेलं असावं, अशी भीती पालक व्यक्त करत आहेत. पण त्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही, असे केजरीवाल म्हणाले. आजपर्यंत इतकी क्रूरता कधीच पाहायला मिळाली नव्हती. जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरने जे केलं होतं, त्यालाही मोदींनी मागे टाकलं आहे, असं वाटतं. काही लोक तर म्हणत आहेत की, जनरल डायरचा आत्माच मोदींच्या रूपात पुन्हा जन्माला आला आहे असा घणाघाती अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
थोड्याच वेळापूर्वी मोदी सरकारच्या पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. त्यात असं म्हटलं आहे की, कालच्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाविरोधात कठोर गुन्हे दाखल केले जातील. मी मोदींना सांगू इच्छितो की, हा देश तुमच्या वडिलांचा नाही. हा देश 140 कोटी जनतेचा आहे. लोकांना धमक्या देणं बंद करा. अशा धमक्या देणं थांबवा. अन्यथा या देशातील जनता तुम्हाला असा धडा शिकवेल की, इतिहासात एका हुकूमशहाचा शेवट कसा झाला, हे कायम लक्षात राहील, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला.
भाजपचा हा नेहमीचाच ठरलेला प्रचार आहे. मोदीजी म्हणतात की हे विद्यार्थी देशविरोधी आहेत. पण मी मोदीजींना सांगू इच्छितो की, या देशातील सर्वात मोठे देशविरोधी तुम्हीच आहात. ते म्हणतात की हे विद्यार्थी दहशतवादी आहेत. पण या देशातील सर्वात मोठे दहशतवादी तुम्हीच आहात. हा देश आता तुमच्यामुळे त्रस्त झाला आहे. विद्यार्थ्यांवर जे आरोप केले जात आहेत, ते पूर्णपणे खोटे आहेत. ही मुलं आपलीच आहेत, असेही केजरीवाल म्हणाले.
ही मुलं तुमच्याकडे काय मागत आहेत? ते एवढंच म्हणत आहेत की, पेपरफुटी थांबवा. एक पंतप्रधान असूनही तुम्ही पेपरफुटी थांबवू शकत नाही. याचा अर्थ दोनच शक्यता आहेत. एकतर तुम्ही पूर्णपणे असहाय्य आहात किंवा पेपरफुटीतून मिळणारा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि त्यानंतरही तुम्ही या विद्यार्थ्यांनाच देशविरोधी आणि दहशतवादी म्हणत आहात. काल असेही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामध्ये पोलीस विद्यार्थ्यांवर दगडफेक करताना दिसत आहेत. दगडफेक करणं हे पोलिसांचं काम आहे का? असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी विचारला.





























































