केईएममधील शवचिकित्सा कक्षाची वेळ वाढली, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केईएममध्ये अपघात किंवा इतर काही आजाराने निधन झालेल्या मृतदेहाची शवचिकित्सा (पोर्स्ट मॉर्टम) करण्यासाठी ठरावित वेळेचे बंधन होते. त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात वेळ लागत असे. नातेवाईकांची ही अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने ही वेळ वाढवण्यात यावी यासाठी पालिका, केईएम प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून पालिका प्रशासनाने शवचिकित्सेची वेळ वाढवली असून नातेवाईकांची गैरसोय टळणार आहे. दरम्यान, कक्षातील पायाभूत सुविधा, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबतही पालिका प्रशासन सकारात्मक आहे.

परळमधील मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण दाखल होतात. मात्र उपचारादरम्यान किंवा अपघातात काही रुग्णांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शवचिकित्सा केली जाते. शवचिकित्सेची वेळ काही ठराविक काळासाठी असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात मिळण्यास वेळ लागतो. या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक सचिन पडवळ आणि अनिल कोकीळ यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. याबाबत केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. यात कक्षाची वेळ वाढवण्याचा निर्णय झाला. बैठकीला केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, डॉ. रवींद्र देवकर, डॉ. दक्षा प्रभात, डॉ. गिरीश तासगांवकर, डॉ. रचना चतुर्वेदी, देवानंद कदम व बाळा मुगदार आदी उपस्थित होते.

शवचिकित्सेची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी होती. मात्र आता ही वेळ सकाळी 9 ते सकाळी 6 अशी वाढवण्यात आली आहे. काही आजारांमुळे निधन झालेल्या मृतदेहांची शवचिकित्सा करण्यासाठी हा कक्ष 1 एप्रिलपासून दिवसभर सुरू राहणार आहे.