केतन अगरवाल हत्याकांड – केसांचा विग, बोलताना अडखळतो म्हणून तिला तो आवडत नव्हता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याला लोहगडावरून ढकलून देऊन केलेल्या खून प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यावसायिक केतन अगरवाल यांच्या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. केतनला टक्कल असल्यामुळे तो केसांचा विग वापरत होता. तसेच तो बोलतानाही अडखळत असल्याचा दावा होणारी पत्नी सिया गोयल हिने केला आहे. त्यामुळे केतन तिला पसंत नसल्याने तिने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे.

बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा केतन आणि मार्केटयार्डातील मसाले विक्रीचे व्यापारी प्रवीण गोयल यांची मुलगी सिया यांचा साखरपुडा झाला होता. तत्पूर्वी, केतनच्या वडिलांनी मुलाला टक्कल असून तो विग वापरत असल्याची माहिती सियाच्या कुटुंबीयांना दिली होती. मात्र, केतन बोलतानाही अडखळत होता, त्यामुळे तो सियाला आवडत नव्हता. लग्न मोडून कुटुंबीयांची बदनामी टाळण्यासाठी तिने यासंदर्भात कुठेही वाच्यता केली नाही. सियाला केतनसोबत लग्न करणे मान्य नसल्यामुळे तिने आरोपी बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या मदतीने लोहगडावरून ढकलून देत केतनचा खून केला.

सियाच्या भावाची पोलिसांकडून चौकशी

आरोपी सिया गोयल हिचे वडील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी शुक्रवारी तिचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी बोलावले होते.

कुटुंबीयांना दुखवण्याऐवजी केतनलाच दूर केले

“साखरपुड्यानंतर ठरलेले लग्न मोडून मला कुटुंबीयांना दुखवायचे नव्हते. जर आमचे लग्न मोडले असते तर आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्यापेक्षा केतनला आपल्या आयुष्यातून बाजूला काढण्याचा पर्याय योग्य वाटला. त्यासाठी गुगल सर्चद्वारे माहिती घेऊन, लोहगड ट्रेकिंगची रेकी करीत प्लॅन यशस्वी केला,” अशी कबुली सियाने पोलिसांना दिली आहे. ट्रेकिंगच्या वेळी केतनचा मृत्यू झाल्यास जास्त संशय येणार नाही आणि गडावर फारसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ही गोष्ट कोणालाही समजणार नाही, असे सियाला वाटले होते. त्यामुळे तिने केतनची हत्या केली.