खडकवासला धरणक्षेत्रात जून महिना कोरडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

जून महिना सरला तरी पाऊस गायब असल्याने धरणांची ओटी रिकामीच आहे. गतवर्षीच्या शिल्लक पाणीसाठ्यावर सध्या तहान भागवली जात आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गतवर्षीच्या तुलनेत सव्वा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. पावसाचा रूसवा कायम असल्याने सध्या चिंतेची स्थिती आहे.

खडकवासला धरण साखळीत २० जून अखेर नीच्चांकी २.९९ टीएमसी म्हणजेच १० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यानंतर धरणक्षेत्रात थोडाफार पाऊस झाल्याने हा साठा ३.४७ टीएमसी आजपर्यंत झाला. गतवर्षीची तुलना करता १ जुलै रोजी ४.७८ टीएमसी म्हणजेच १६.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा तो १.३१ टीएमसीने कमी आहे.

पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या वरसगावमध्ये शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. टेमघर धरणात ०.१३ टीएमसी म्हणजे ३.५१ टक्के, पानशेतमध्ये २.७६ टीएमसी तथा २५ टक्के आणि खडकवासलामध्ये ०.५८ टीएमसी म्हणजे २९.५७ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा कमी असून, पावसाने अशीच दडी मारल्यास शहरावर पाणीकपातीचे संकट येऊ शकते. शहराची एका महिन्याची पाण्याची गरज १.२५ टीएमसीदरम्यान आहे. त्यामुळे सध्याचा उपयुक्त पाणीसाठा तीन महिने पुरेल. शेतीसाठीचे अवर्तन बंद केले असून, सध्यातरी पिण्याच्या पाण्याची मागणी दौंड, इंदापूर तालुक्यातून नाही. आळंदी-पंढरपूर वारीदरम्यान कालव्यातून पाण्याची मागणी येईल. तोपर्यंत पाऊस न झाल्यास पाणी सोडण्याचा विचार होऊ शकतो.

जलसंपदा विभागातील खडकवासला विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईची शक्यता निर्माण होणार नाही. पाणी कपातीबद्दल कोणताही निर्णय घेतला नसून तसा प्रस्ताव कृष्णा खोरे विभागापुढे नाही. हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज दिल्याने पाऊस होईल. सध्यातरी सामान्य परिस्थिती असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.