खंबाटकी बोगद्यात सात वाहने एकमेकांना धडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा ते पुणे महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात आज सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने वेगात निघालेल्या सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. पुढील वाहनांना मागच्या वाहनांची धडक बसल्याने झालेल्या या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

दिवाळी संपल्याने पुणे-मुंबईकडे जाणाऱया वाहनांची महामार्गावर गर्दी आहे. यातच आज सकाळी सातारा शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या खंबाटकी बोगद्यात ही विचित्र दुर्घटना घडली. प्रत्येकाला घाई असल्याने पुढे जाण्याच्या नादात अचानक लेन बदलण्याच्या प्रकारामुळे मागील वाहनाने पुढील वाहनाला धडक दिली.

या अचानक दणक्याने एकूण सात वाहने अपघातग्रस्त झाली. रस्त्यावरील खड्डय़ांमुळेही या अपघाताला निमंत्रण मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा पोहोचली नाही. परंतु, मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली. यानंतर घटनास्थळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभे व जाधव आदींनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.