लोटे औद्योगिक वसाहत स्फोटाने पुन्हा एकदा हादरली, तीन कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोटे औद्योगिक वसाहत आज पुन्हा एकदा स्फोटाने हादरली. घरडा केमिकल्स या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच जणांचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी 9 वाजता याच औद्योगिक वसाहतीतील श्री समर्थ इंजिनिअर्स या कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट होऊन तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पशुराम हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारांसाठी सांगली आणि मिरज येथे हलविण्यात आले आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री समर्थ इंजिनिअर्स ही कंपनी अमित जोशी यांच्या मालकीची असून ते डिस्ट्रीलेशन प्लॅन्ट चालवतात. आज सकाळच्या पाळीत 9 कर्मचारी 1 सुरक्षा रक्षक आणि 1 सफाई कामगार कार्यरत होते. 9 वाजण्याच्या सुमारास या प्लॅन्टच्या रिअॅक्टरचे तापमान अचानक वाढले आणि रिअॅक्टरचा जोरदार धमाका झाला. हा धमाका एवढा मोठा होता की सुमारे 4 किलोमिटर पर्यंतचा परिसर हादरला. रिअॅक्टरचा स्फोट होताच रिअॅक्टरमधून बाहेर पडलेल्या वाफेचे रुपांतर आगीत झाले आणि कंपनीच्या आवारात असलेल्या सॉलव्हॅन्टच्या ड्रमनी पेट घेतला.
कंपनीच्या आवारात शेकडो सॉलव्हन्टचे ड्रम असल्याने या ड्रमचे स्फोट होवू लागले आणि आगीने रौद्ररुप धारण केले.

स्थानिक युवक आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी कंपनीच्या आवारात असलेले शेकडो सॉलव्हन्टचे ड्रम बाहेर काढल्याने आगीला वेळीच रोखण्यात यश आले. तरीही सकाळी 9 वाजता सुरु झालेले अग्नीतांडव 11.30 वाजेपर्यंत सुरुच होते. या आगीत जानकर (पुर्ण नाव माहित नाही) सचीन थरवळ, विलास कदम हे तिघे कामगार प्लॅन्टमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर परवेझ अलम, ओमकार साळवी, रामचंद्र बहुतले, विश्वास शिंदे, विलास खरावते, नितेश आखाडे हे जखमी झाले.

जखमीपैकी विलास खरावते हा कंपनीचा कर्मचारी नसून तो आग विझविण्यासाठी मदत म्हणून स्थानिकांसोबत काम करत होता. आग विझविण्यासाठी लोटे औद्योगिक वसाहत फायर स्टेशनचे दोन बंब, तसेच खेड नगरपालिका व चिपळूण नगरपालिकेचा बंब अशा चार फायर फायटर कार्यरत होते. अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या दुर्घटनेत करोडो रुपयांचे आर्थिक हानी झाली आहे.