अस्सल सातारकर

अभिनेते किरण माने. आपल्या सातारकडच्या झणझणीत चवीशी इमान राखून आहेत.

 • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – खाणं म्हणजे सुख, आनंद.
 • खायला काय आवडतं? – मला कोल्हापुरी मटण, तांबडा पांढरा रस्सा प्रचंड आवडतं. शाकारात गोड पदार्थ यामध्ये पुरणपोळी, गुलाबजाम, श्रीखंड, आम्रखंड असे पदार्थ आवडतात. तिखट पदार्थ मांसाहार प्रिय आहे. इराणी हॉटेलमधील ‘अफलातून’ हा पदार्थ खूप आवडतो.
 • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – खाण्यापिण्यावर बंधनं नसतात, पण वेळच्यावेळी जेवण, नाश्ता करण्यावर भर असतो. खाण्यात हे नको ते नको असं फार पाळत नाही. चौरस आहार घेणं महत्त्वाचं आहे. या जोडीला व्यायाम करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.
 • डाएट करता का? – करत नाही, कारण मी खवय्या आहे त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. तरीही नियमित व्यायाम करत असल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. फक्त खातोय आणि बसलोय असं नाही करत.
 • आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – दौऱ्यावर असलो किंवा प्रयोग संपायला उशीर झाली की बाहेरच खावं लागतं. माझं घर सातऱ्यात आहे आणि नाटक, चित्रीकरणासाठी मुंबईला येतो. त्यामुळे बऱ्याचदा बाहेर खावं लागतं.
 • कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – ज्यावेळी जसा मूड असेल त्याप्रमाणे जातो. मला सात्त्विक आहार घ्यायचा असेल तर दादरमधील तृप्ती, आस्वादमध्ये जातो. मांसाहारात अस्सल कोल्हापुरी खायचं असेल तेव्हा पुरेपूर कोल्हापूरमध्ये जातो. मालवणी पद्धतीचं खायचं असेल तर गोमंतकमध्ये जातो.
 • कोणतं पेय आवडतं? – सगळे ज्यूस, सरबतं, मिल्कशेक आवडतं. त्यातही लस्सी खूपच आवडते. खूपदा जेवणानंतर गोड लस्सी मी घेतो.
 • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – प्रयोगाआधी थोडं कमी म्हणजे भूक राखून खातो. डोसा उत्तप्पा असे पदार्थ खातो. कारण प्रयोग सुरू होण्याआधी भरपूर जेवण केलं तर त्रास होतं. रात्री कितीही वाजता प्रयोग संपला तरी प्रयोगानंतर व्यवस्थित जेवतो.
 • दौऱ्यानिमित्त आवडलेला खास पदार्थ ? – खाण्यातली स्पेशालिटी प्रत्येकवेळी शोधत असतोच. बऱ्याच ठिकाणी मला वेगवेगळे पदार्थ खायला मिळालेले आहेत. उस्मानाबादचे गुलाबजाम प्रसिद्ध आहेत. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे गुलाबजाम मिळतात. हे माहीत नव्हतं ते तिथे गेल्यावर कळलं. मी घाटावरचा असल्यामुळे मासे कमी खातो, पण नाटकाच्या दौऱयांमुळे मला माशांची गोडी लागली. माशांचे विविध प्रकार खायला मिळाले. त्याची मजा वेगळी आहे. गाव, हॉटेल सगळीकडचीच खासीयत शोधून काढतो.
 • स्ट्रिट फूड आवडतं का? – हो. पाणीपुरी, शेवपुरी आवडते.
 • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – घरचे सगळेच पदार्थ आवडतात. साताऱ्यात शाकाहारात ‘चकुल्या’ शेंगदाण्याच्या कुटाचा ‘महाद्या’ पदार्थ चवीला खूपच छान असतो.
 • जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? – घरगुती पद्धतीचं मटण, शेंगदाण्याच्या कुटाचा महाद्या, चकुल्या असेच पदार्थ बनवले जातात. कारण पाहुण्यांना वेगळ्या पदार्थांची चव घ्यायला मिळते.
 • उपवास करता का? – उपवासाचे सगळेच पदार्थ खायला आवडतात. वर्षातून एकदा आषाढी एकादशीचा उपवास करतो.
 • स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी? – कोणताही पदार्थ बनवता येत नाही.