
अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमिनीची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा दावा करून आपली, कुटुंबाची व आपल्या पक्षाची नाहक बदनामी केली आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी केला आहे. त्यांनी आज याप्रकरणी भाजपचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा ठोकला आहे.
आरोप करताना किरीट सोमय्यांनी कुठलेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे आपली, आपल्या कुटुंबाची व पक्षाची बदनामी केल्याचा तसेच मानसिक त्रास दिल्याचा दावा करत आमदार रवींद्र वायकर यांनी अॅड. तमसीन मोनिस यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे.
एवढेच नव्हे तर, वायकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त, एमआयडीसी पोलीस ठाण्यास पत्र देऊन किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. आपल्या अशिलाबाबत सोमय्या यांनी कोणतेही वक्तव्य करू नये, यासंदर्भात ट्विट तसेच पत्रकार परिषदही घेऊ नये, हायकोर्टाने तसे सोमय्या याना आदेश द्यावेत अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर हायकोर्टात लवकरच सुनावणीची शक्यता आहे.




























































