
भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे मुंबई विद्यापीठातील बोगस डॉक्टरेट प्रकरण येत्या हिवाळी अधिवेशनातही गाजणार आहे. सोमय्या यांच्या डॉक्टरेटविषयी माहिती देण्यास मुंबई विद्यापीठ टाळाटाळ करीत असल्याने तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गतही माहिती मिळत नसल्याने युवासेना माजी सिनेट सदस्यांनी विधिमंडळाचे दरवाजे ठोठावले आहेत. याप्रकरणी विधिमंडळात चर्चा घडवून सत्य जनतेसमोर आणा, अशी मागणी सिनेट सदस्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शीतल देवरुखकर-शेठ, डॉ. धनराज कोहचाडे, अॅड. वैभव थोरात यांनी थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदन दिले आहे. मुन्नाभाई सोमय्याप्रकरणी अधिवेशनात चर्चा घडवून सत्यता जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



























































