समर्थकाला ऊसाच्या फडात नेऊन चोपल्यानंतर कोल्हापुरात पुन्हा रंगले ‘धोनी विरुद्ध शर्मा’ पोस्टरवाॅर

आयपीएल क्रिकेट सामन्यांपूर्वीच महेंद्रसिंग धोनी विरुद्ध रोहित शर्मा समर्थकांच्या पोस्टरवाॅर मधून एकाला ऊसाच्या फडात नेऊन चोप दिल्याचा प्रकार महिनाभरापूर्वी घडला होता. आता प्रत्यक्षात आयपीएल सामने सुरु झाल्यानंतरही पुन्हा एकदा धोनी विरुद्ध शर्मा समर्थकांचे पोस्टरवाॅर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात हे सर्व घडत आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरोळ तालुक्यात कुरूंदवाड गावात तर आता पश्चिम भागात राधानगरी तालुक्यात हे पोस्टरवाॅर रंगले आहे.

आयपीएल 2020 चा 13 वा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. तत्पूर्वी अनेक खेळाडुंचे आकर्षण असल्याने गावागावांत विविध टीम आणि त्यांचे समर्थकांचेही गट निर्माण झाले आहेत. यातूनच गट-तट आणि एकमेकांविरोधात इर्षाही आत्तापासूनच शिगेला पोहोचू लागली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी भडकलेले पोस्टरवाॅर पुन्हा धोनी विरुद्ध शर्मा असेच सुरु राहिले आहे. सोशल मीडियातून दिसणारी ही इर्षा चक्क मोठमोठ्या फलकांद्वारे तेही ग्रामीण भागातील चौकात झळकु लागली आहे.

पहिल्याच सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील मार्केट चौकात दोन्ही मुंबई इंडियन्सला लागुनच चेन्नई सुपर किंगच्या टीमचे भव्य पोस्टर लावण्यात आले आहे. दोन्हीवर फक्त महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचेच फोटो आहेत. मुंबई इंडियन्सच्या पोस्टरवर “जल मत बराबरी कर”, “नावातच दहशत” आणि “आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात” असा मजकूर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जच्या पोस्टरवर “धोनी साहेब” व “आण्णा गेले बंबात” असा एकमेकांना चिथावणी देणारा मजकुर आहे. गेल्या एक-दोन दिवसांपासुन हे पोस्टर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. सुदैवाने यावरुन अद्यापतरी कोणताही अनुचित प्रकार अजुन समोर आलेला नाही. शिवाय पोलिसांकडूनही कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

सेहवागच्या सल्ल्याचा समर्थकांना विसर
गेल्या महिन्यात शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड येथे धोनी विरुद्ध शर्मा यांच्यातील पोस्टर वाॅर मधुन एका गटाच्या समर्थकाला ऊसाच्या फडात नेऊन चोप दिल्याचा प्रकार घडला असताना याची दखल घेत हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी आम्ही सर्व खेळाडू एकच असल्याचे सांगुन अशा क्रिकेटप्रेमींनाही साद घालत कान टोचले होते. पण पुन्हा असे पोस्टरवाॅर रंगु लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या