कोल्हापुरात पाण्याच्या टॅंकरवरून लग्नाची वरात; पाणीप्रश्न सुटेपर्यंत हनिमूनलाच जाणार नाही! वरातीत लागला फलक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर भागातील पाणी समस्येवर लक्ष वेधण्यासाठी नवदांपत्याची थेट पाण्याच्या टॅंकरवरूनच काढलेली वरात आता चर्चेत आली आहे. मंगळवार पेठेतील ऐतिहासिक खासबाग मैदान परिसरात सायंकाळी निघालेली ही वरात जितकी लक्षवेधी ठरली, तितकाच या नवदांपत्यांच्या फलकाचीही चर्चा रंगली आहे. जोपर्यंत‌ पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हनिमूनलाच जाणार नसल्याचा फलक या दांपत्याने वरातीत लावला आहे.

कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगळवार पेठे परिसरात नेहमीच पाण्यासाठी आंदोलने होतात. येथील प्रिन्स क्लब, खासबागचे कार्यकर्ते विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे गुरुवारी विवाहबद्ध झाले. त्या निमित्ताने त्यांची महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, खासबाग परिसरातून अभिनव पद्धतीने चक्क पाण्याच्या टॅंकरवरुनच वरात काढण्यात आली.

महिला व मुले डोक्यावर रिकाम्या घागरी घेऊन, पारंपरिक हलगीच्या तालावर नाचत होते. पाण्याच्या टँकरवर बसलेल्या वधू वराच्या मागे मोठ्या फलकावरील “महापालिकेच्या चावीला नियमित पाणी येत नाही. म्हणून बायकोला त्रास नको. त्यासाठी हुंडा म्हणून, आम्ही पाण्याचा टँकर घेतलाय!” असा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यात “जोपर्यंत खासबाग परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही.” अशा आणखी एका फलकानेही सर्वांची हसावे की रडावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान लग्नाची ही वरात रात्री उशिरा नवरदेवांच्या गल्लीत पोहोचल्यावर नवदांपत्यांनी टँकरची पाईप हातात घेऊन, घरात पाणीपुरवठा केला. या अजब लग्न मिरवणुकीचे संयोजन सचिन साबळे, अमित पोवार, रमेश मोरे, अभिजीत पोवार, संजय पिसाळे, संदीप पोवार, अशोक पोवार आदी कार्यकर्त्यांनी केले.