
समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यांतून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिलांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कासव मित्रांनी समुद्रात सोडले. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यांपूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती. ही अंडी येथील कासव मित्र कृष्णा धुरी, महादेव जोशी, सूर्यकांत धुरी, जितेंद्र धुरी, शरद धुरी, रामचंद्र कुबल, प्रकाश धुरी, प्रथमेश धुरी आदी कासव मित्रांनी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वी समुद्र किनारी संरक्षित करून ठेवली होती. सोमवारी सकाळपासूनच संरक्षित अंडय़ांतून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी सायंकाळी वनरक्षक सारीक फकीर, वनपाल श्रीकृष्ण परीट, वनमजूर अनिल परब, कांदळवन प्रक्षेत्राच्या मृणालिनी डांगे, नेहा नार्वेकर, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी आदींच्या उपस्थितीत कासव मित्रांनी ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिलांना समुद्रात सोडले.





























































