खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत उत्तर देण्यास प्रशासनाची टाळाटाळ; संतप्त शिवसैनिकांनी रोखले काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरात गॅस पाईपलाईनसाठी रस्त्याची खोदणी सुरु आहे. रस्ता खोदकाम केल्यानंतर त्या रस्त्याची दुरुस्ती कशी होणार याबाबत कोणतीही माहिती नगरपरिषदेकडून प्राप्त होत नसल्यामुळे आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने चिपळूण शहरातील अभिषेक गल्लीतील रस्त्याचे खोदकाम थांबवण्यात आले.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना निवेदन देऊन अभिषेक गल्लीतील रस्ते खोदाईचे काम थांबवले असल्याची माहिती दिली. निवेदनात असे म्हटले आहे की, रस्ते खोदाई करून गॅस पाईपलाईन टाकून झाल्यावर रस्ते पुर्ववत कसे केले जाणार आहेत याची माहिती मिळत नाही. मुख्याधिका-यांकडूनही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे आम्ही अभिषेक गल्लीतील रस्ते खोदाईचे काम थांबवत आहोत. खोदाईमुळे रस्ता खराब होणार आहे त्यामुळे गॅस पाईपलाईन टाकून झाल्यानंतर रस्ता केव्हा आणि कसा दुरुस्त होणारी याची माहिती द्यावी आणि त्यानंतर रस्ते खोदाई सुरु करावी अशी मागणी शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी केली आहे. यावेळी चिपळूण विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम, चिपळूणचे तालुकाप्रमुख विनोद झगडे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.