‘विराट’ने 36 तासात शोधला घरफोडीतील चोरटा

चिपळूण तालुक्यातील कळंबट गावामध्ये एकट्या राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत पावणेदोन लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. रत्नागिरी पोलीसांनी विराट श्वानाच्या माध्यमातून 36 तासात ही घरफोडी उघड करत चोरट्याला ताब्यात घेतले आहे.

19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान कळंबट येथील एका महिलेच्या घरामध्ये घरफोडी झाली. चोरट्याने पावणेदोन लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. यावेळी शोधमोहिमेसाठी रत्नागिरी श्वानपथकात कार्यरत असलेल्या श्वान विराट याला पाचारण करण्यात आले. यावेळी घटनास्थळी मिळून आलेल्या पर्सचा गंध श्वान विराटला देण्यात आला. पर्सचा गंध घेताच श्वान विराट 150 मीटरच्या अंतरावर असलेल्या एका घराजवळ येऊन थांबला आणि भुंकून इशारा देऊ लागला. श्वानाने इशारा देताच तपास पथक घरात शिरले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी घरातील त्या व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली. त्या व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक रत्नदिप साळोखे, सहाय्यक निरिक्षक श्वान पथक श्रीमती मडवी, पोलीस उपनिरिक्षक धनश्री करंजकर, पोलीस फौजदार प्रदिप गमरे आणि त्यांच्या पथकाने केली.