
नायलॉन मांजाला पूर्णतः हद्दपार करण्यासाठी कोपरगाव शहर नगरपालिकेने कठोर पावले उचलली असून नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी दोन पथके सज्ज करण्यात आली आहेत. यात नगर पालिकेसोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहभाग राहणार आहे. नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी कोपरगाव शहर नगरपालिकेत आरोग्य विभाग मार्केट विभाग पथकाची आढावा बैठक मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपमुख्याधिकारी मनोज पापडीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व मार्केट विभाग यांची दोन फिरती पथके नियुक्त करण्यात आले
या पथकात आरोग्य विभागाकडील प्र. आरोग्य निरीक्षक, सुनील आरण व त्यांचे अधिनस्त असलेले मुकादम योगेश कोपरे, विजय डाके, मनोज लोट, अरुण फाजगे, रणधीर तांबे, पवन हाडा, रविंद्र दिनकर, रमेश घोरपडे असे एकूण आठ मुकादम तसेच मार्केट विभागाचे संजय तिरसे व त्यांचे अधिनस्त असलेले कर्मचारी सतीष साबळे व रोहित राक्षे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अशा धाग्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. पतंग उडवितांना केलेल्या माजांच्या वापरामुळे शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. दुचाकीस्वार हे किंवा पदचारी नागरिक यांचे गळ्यास किंवा शरीरास दुखापत होऊन जीवित हानी होऊ शकते तसेच पक्षाचे पंखास अडकून पक्षांना दुखापत होते.विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवीत हानी होणे इत्यादी प्रकारच्या घटना घडू शकतात. याबाबतची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नायलॉन मांजाच्या धाग्याच्या दुष्परिणामांबाबत शाळा,महाविद्यालय तसेच लोकांमध्ये जनजागृती करावी. तसेच सर्व नागरिकांनी निर्देशाचे पालन करावे, असेही मुख्याधिकारी गोसावी यांनी यांनी सूचित केले. कोपरगाव शहरात मकर संक्रातीला नागरिक व मुले मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, घरांवर पतंग उडविण्याचा आनंद घेतात. नायलॉन मांजा खरेदी न करता उत्तमप्रतीचा मांजा बनवून किंवा विकत घेवून नागरिकांनी आपला आंनद द्विगुणीत करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे.
शहरातील मांजा, पतंग विक्रते व नागरिक यांना जाहीर सूचित करण्यात येते की, नायलॉन मांजाची विक्री, खरेदी व वापर करू नये तसे आढळल्यास नगरपरिषदेमार्फत नेमलेल्या पथकाकडून आपलेकडील नायलॉन मांजा जप्त करून भा.द.वि कलम १८८ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल स्वरुपाची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. अशी माहिती उपमुख्य अधिकारी मनोज पापडीवाल यांनी दिली आहे.





























































