खुशखबर! कोयनेतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होणार, तीन दिवसांत सात टीएमसी पाणीसाठा वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयना जलविद्युत केंद्रातून आता पूर्ण क्षमतेने म्हणजे 1940 मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती होऊ शकणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात सुमारे 986 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून गेल्या तीन दिवसांत तब्बल सात टीएमसीने पाणीसाठा वाढून 20.2 टीएमसीवर पोहचला आहे. दररोज सुमारे अडीच टीमएसीपेक्षा जास्त साठा वाढत असल्याने महानिर्मितीला येथून गरजेनुसार हवी तेवढी वीजनिर्मिती करता येणार आहे.

यंदा जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने कोयना धरणातील पाणीपातळी 13 टीएमसीपर्यंत खाली आली होती. वीजनिर्मितीसाठी 20 टीएमसीपर्यंतच पाणी वापरता येते, मात्र 1 जून रोजी नवीन जलवर्ष सुरू झाल्याने महानिर्मितीसाठी नवा पाणीसाठा खुला झाला होता, मात्र धरणात प्रत्यक्षात पाणी कमी असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून येथील वीजनिर्मिती रोडावली होती. त्यामुळे जुलैमध्ये कशी वीजनिर्मिती करायची, असा प्रश्न महानिर्मितीसमोर उभा राहिला होता, मात्र चार-पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होऊ लागली असून जुलैअखेरपर्यंत पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास 80 टीएमसीपर्यंत पाणीसाठा होईल, असे महानिर्मितीच्या एका अधिकाऱयाने स्पष्ट केले आहे.

धरण क्षेत्रातील आतापर्यंतचा पाऊस

नवजा लेक – 896 मिमी
कोयना – 684 मिमी
पोफळी – 986 मिमी
महाबळेश्वर – 840 मिमी