
कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातून पसार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सराइताच्या विरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय 18, रा. भोसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष किसन कुंभार (वय 46) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येरवड्यात पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राचे निरीक्षण गृह आहे. गंभीर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात ठेवण्यात येते. काही दिवसांपूर्वी हडपसर भागात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या सात अल्पवयीन मुलांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात ठेवले होते. सोमवारी अल्पवयीन मुले निरीक्षण गृहातील सीमाभिंतीवर शिडी लावून चढले. भिंतीवरुन उड्या मारुन पसार झाली. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांना शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत.





























































