
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे बाहेरील ‘रिमोट कंट्रोल’वर काम करायचे असा बॉम्बगोळा नुकतेच निवृत्त झालेले माजी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी फेकला आहे. मिश्रा सरन्यायाधीश असताना त्यांच्या विरोधात बंड करणाऱया चार न्यायमूर्तींमध्ये कुरियन यांचाही समावेश होता.
दीपक मिश्रा हे सरन्यायाधीश असताना बाहेरील दबावाखाली काम करायचे. त्याचा परिणाम न्यायालयाच्या प्रशासकीय कामकाजावर झाला होता असे कुरियन यांनी सांगितले. माजी सरन्यायाधीश मिश्रा हे रिमोट कंट्रोलवर कामकाज करायचे असा दावा आपण कशाच्या आधारे करता असे विचारले असता ‘तसा इतर न्यायमूर्तींचा समज झाला होता’ असे ते म्हणाले. कुरियन यांनी दीपक मिश्रा यांच्यावर तोफ डागताच न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा केंद्र सरकारवरील आरोप सिद्ध झाला आहे असे काँग्रेसने म्हटले आहे.




























































