
केवायसी अपडेटच्या नावाखाली खासगी बँकेत काम करणाऱया कर्मचाऱयाच्या फसवणूकप्रकरणी एकाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. शोभा मंडल असे त्याचे नाव आहे. तो दिवसा टॅक्सी चालवतो आणि साईड बिझनेस म्हणून ठगांना बँक खाते पुरवण्याचे काम करतो. त्याने आतापर्यंत शीव, माटुंगा परिसरातील सरकारी आणि को-ऑप. बँकांमध्ये खाती उघडली आहेत. खात्याच्या मोबदल्यात 10 टक्के कमिशन मिळायचे.
तक्रारदार हे विरार येथे राहत असून ते एका खासगी बँकेत काम करतात. जुलै महिन्यात ते प्रवास करत होते, तेव्हा त्यांना मोबाईलवर एक लिंक आली. केवायसी अपडेट न केल्यास खाते ब्लॉक केले जाईल असे त्यात नमूद होते. ती लिंक उघडल्यानंतर एक बँकेचे पेज उघडले. त्या पेजवर लॉगिन केले. लॉगिन केल्यावर तक्रारदार यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. ओटीपी आल्यावर त्यांच्या खात्यातून 44 हजार रुपये काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकातील मोरे, मुजावर, खराडे, सकपाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला. ज्या खात्यात पैसे गेले त्याची माहिती पोलिसांनी काढली. ते खाते मंडलच्या नावावर असल्याचे समजताच पोलिसांचे पथक धारावी येथे गेले. धारावी येथे गेल्यावर पोलिसांनी 200 रिक्षा टॅक्सी चालकांची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आठ दिवस धारावी येथे फिल्डिंग लावून मंडलला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने एकाच नावाने 16 बँक खाते उघडल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पकडू नये म्हणून मंडल हा वारंवार पत्ते बदलून राहायचा. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोबाईलवर आलेला ओटीपी अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये. लिंक आली असल्यास ती तपासावी. संशयास्पद वाटल्यास त्या लिंकवर माहिती शेअर करू नये.
– अनिल कदम, वरिष्ठ निरीक्षक बोरिवली रेल्वे पोलीस, ठाणे

























































