
>>लहू रावराणे<<
प्लॅस्टिक बंद म्हणजे नेमके काय? किती प्रकारचे प्लॅस्टिक आपल्या रोजच्या वापरात आहे ते पाहू.
> पीईटी किंवा पीईटीई (पॉलिस्टर) – ज्याच्यापासून सॉफ्ट ड्रिंकची बाटली, पाण्याची बाटली, केचअप किंवा सॉसची बाटली बनते, पॉलिस्टर फिल्म बनते.
> एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलीइथलीन) – ज्याच्यापासून तेलाचे डबे बनतात, शाम्पूची बाटली बनते, शॉपिंग बॅग्ज बनतात तसेच शेतीचे काळे पाइप बनतात, कॉस्मेटिक पावडरचे डबे बनतात.
> पीव्हीसी (पॉलीविनिल क्लोराईड) – ज्याच्यापासून खेळणी बनतात, बादल्या बनतात तसेच बाथरूमचे पडदे बनतात, शेतीचे पाइप बनतात, इलेक्ट्रिकल काळे पाइप बनतात, पाण्याची लेबल, फिल्म बनते, घराची शेड बनते आणि इतर.
> एलडीपीई (लो डेन्सिटी पॉली इथलिन) – ज्याच्यापासून पातळ बॅग, ब्रेड बॅग, फरसाण बॅग, कचरा बॅग बनतात, पॅकिंग फिल्म बनते, अन्न वेष्टन फिल्म बनते.
> पीपी (पॉलीप्रोपिलीन) – पातळ बॅग बनते आणि ज्याच्यापासून औषधांच्या बाटल्या, स्ट्रॉ, सर्व बाटल्यांची झाकणे बनतात.
> पीएस (पॉलीस्टायरिन) – ज्याच्यापासून थर्माकोल कप, प्लेटस्, बॉक्स बनतो (सर्वात धोकादायक).
> आणि इतर अनेक एचआईपी ज्याच्या शीट फ्रीजमध्ये वापरतात. श्रीखंडाचे डबे बनतात, दहय़ाचे डबे बनतात तसेच एबीएस ज्याच्यापासून बॅग, सुटकेस बनतात, धाग्याचे कोन बनतात.
आता कुठले प्लॅस्टिक वापरायचे आणि कुठचे नाही हे तज्ञ माणसांना विचारूनच सरकारने बंदी ठरविली असणार. त्याआधी प्लॅस्टिक का नको?
> प्लॅस्टिक हे पेट्रोलियम उत्पादनांपासून बनविले जाते आणि त्याच्यामध्ये खूपशी केमिकल्स आणि घटक द्रव्ये असतात. प्लॅस्टिक हे जमिनीत विरघळत नाही/मुरत नाही. त्यामुळे जमीन नापीक होऊ शकते.
> प्लॅस्टिक पाण्यात विरघळत नाही तर ते पाण्यावर तरंगते. काही तुकडे पाण्यात हेलकावे खात असतात. लाटेबरोबर ते किनाऱ्यावर येऊन धडकतात.
> प्लॅस्टिक/थर्माकोल गरम झाले की, त्यातून रसायन निघते आणि जाळले तर वायूदेखील निघतो. तो शरीराला धोकादायक असतो. म्हणूनच थर्माकोलच्या प्लेटवर गरम जेवण घेऊ नये.
> प्लॅस्टिक बॅक लवचीक असल्याने लवकर फाटत नाही आणि पाणी वाहण्याचा स्रोत अडवते. त्या प्लॅस्टिकमध्ये पालापाचोळा, दगड, माती आणि इतर सर्व काही अडकते आणि ते गटारांमधून समुद्रापर्यंत जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच सर्वत्र पूरमय परिस्थिती होते.
> टाकलेल्या प्लॅस्टिकचे हवा, पाणी, आर्द्रता आणि उष्णतेमुळे बारीक तुकडे होतात. ते तुकडे जमिनीत मिक्स होतात आणि ते बकरे, मेंढी, ससे आणि इतर असंख्य वन्य प्राण्यांच्या पोटात जातात. त्याचे परिणाम मांसाहार करणाऱ्यांना हळूहळू भोगावे लागतात.
> हे तुकडे कोंबडीच्या पोटातदेखील जातात. ज्या कोंबडय़ा आपण प्रजाजन खात असतो.
> समुद्रातील प्लॅस्टिकचे तुकडे मासे खातात आणि तेच मासे आपण खातो.
जेवढे पातळ प्लॅस्टिक तेवढेच ते जास्त धोकादायक. आताच्या घडीला जवळजवळ २० ते २५ मायक्रॉन जाडीच्या पिशव्या वापरल्या जातात आणि त्यावर पूर्ण बंदी आहे. मायक्रॉन म्हणजे पिशवीची जाडी असते. ती मोजण्याकरिता मायक्रोमीटरची आवश्यकता असते. त्याचे ज्ञान दंड करताना सरकारी अधिकाऱ्यांना असणे आवश्यक आहे.
आपल्या देशामध्ये प्लॅस्टिक ‘रिसायकलिंग’ खूपच कमी प्रमाणात होते. ते कदाचित ५ ते १० टक्के एवढेच असण्याची शक्यता आहे. उरलेले प्लॅस्टिक वापरात येते किंवा टाकून दिले जाते. उदाहरणार्थ प्लॅस्टिक पिशवी, पाण्याची किंवा कोल्ड ड्रिंकची बाटली फेकूनच दिली जाते आणि त्यामुळे जमीन, समुद्र, खाडी तसेच नदी, झाडे आणि आपली नैसर्गिक संपत्ती आपणच प्रदूषित करीत असतो.
६० वर्षांपूर्वी प्लॅस्टिक होते कुठे? भाजी किंवा मासे आणण्याकरिता आपण पिशवी अणि डबा घेऊन जात असू. मासे आणल्यावर पिशवी धुतली जात असे आणि तीच परत भाजीकरितादेखील वापरली जात असे, पण प्लॅस्टिक बॅग आल्यापासून ती हलकी असल्यामुळे तसेच वारा, पाऊस यामुळे आतील सामानाचे संरक्षण होत असल्यामुळे व दुकानदार फुकट देत असल्यामुळे आपण प्लॅस्टिक पिशव्यांना लगेच स्वीकारले आणि आपल्यावर संकट ओढवून घेतले. अजूनही वेळ गेलेली नाही. प्लॅस्टिकचा धोका वेळीच ओळखा. प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल घडवून आणला तरच प्लॅस्टिक बंद सहजशक्य होईल आणि आपण स्वतःला आणि पुढच्या पिढीला वाचवू शकू. नाहीतर काही वर्षांनी आपली अवस्थादेखील मोहेंजोदारोसारखी होईल.



























































