बाळासाहेब आपल्यातच आहेत! जेव्हा लतादीदींनी दिला होता जनतेला धीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे 2012 मध्ये महानिर्वाण झाले तेव्हा अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. त्यानंतरच्या 23 जानेवारी 2013 या शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी दै.’सामना’च्या विशेष पुरवणीत लता दीदींनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला होता… ‘बाळासाहेब आपल्यातच आहेत’, असं आश्वासक संबोधन त्यांनी जनतेला केलं होतं. ते संबोधन कायम स्मरणीय राहील…

जसे छत्रपती शिवराय हे आजही आपल्यातच आहेत तसेच बाळासाहेबही राहणार आहेत. शिवाजी महाराज हे बाळासाहेबांचं आराध्य दैवत होतं. महाराष्ट्रावर मराठी भाषा-संस्कृतीवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं. त्यामुळे ज्या ज्या वेळी मराठी माणसावर, महाराष्ट्रावर अन्याय होईल, संकट येईल त्या त्या वेळी बाळासाहेब ठाकरे हा विचारच आपल्याला तारून नेईल. बाळासाहेबांच्या विचारांचा प्रकाश मराठी माणसाला वाट दाखवीत राहील. बाळासाहेब शरीराने जरूर कालवश झाले आहेत, पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते चिरंतन आपल्यातच राहणार आहेत.

कालवश होतं ते शरीर. विचार कालातीत असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एक विचारच होता. हा विचार मराठी भाषा आणि संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या भल्याचा, न्याय्य हक्कांचा होता. प्रखर राष्ट्रवादाचा, तेजस्वी हिंदुत्वाचा होता. शिवसेनेची निर्मितीच त्यांनी त्यासाठी केली होती. त्यामुळे जोपर्यंत मराठी माणूस आहे, महाराष्ट्र आहे, हिंदुत्व आहे तोपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यातच राहतील. बाळासाहेब गेलेत कुठे ? तो तर चिरंतनच राहणार आहे. बाळासाहेब जगले ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी. यासाठीच त्यांनी त्यांचे आयुष्य वेचले, सतत चार दशके अविरत संघर्ष केला. शिवसैनिकांसाठी ते शिवसेनाप्रमुख होते, तर समस्त देशवासीयांसाठी हिंदुह्रदयसम्राट कलाकार, कलावंतांसाठी थोर कलावंत होते, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होते. बाळासाहेब प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी होते. ओजस्वी वाणी आणि तेजस्वी लेखणीचे वरदान त्यांना लाभलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसैनिक आणि सामान्य जनतेसाठी ते ‘आपले साहेब’ होते. माझा आणि त्यांचा स्नेह काही दशकांचा. किंबहुना आम्हा मंगेशकर भावंडांसाठी बाळासाहेब म्हणजे वडीलधारं व्यक्तिमत्त्व. माझ्या वाढदिवशी बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी ‘मातोश्री’वर जाणे हा तर माझा अनेक वर्षे नित्यक्रम होता. मी बाळासाहेबांच्या पाया पडायचे आणि ते मला त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने डोक्यावर हात ठेवून भरभरून आशीर्वाद द्यायचे. गेल्या वर्षीही मी अशीच माझ्या वाढदिवशी ‘मातोश्री’वर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. बाळासाहेबांसोबतची प्रत्येक भेट म्हणजे एक पर्वणीच असायची. खूप बोलणं व्हायचं. बाळासाहेब जोक्स सांगायचे. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. अर्थात, माझ्याशी ते राजकारणावर कधीच बोलले नाहीत. मला त्या प्रांतात इंटरेस्ट नाही हे त्यांना माहीत होतं. कधी कधी बोलण्यात किंवा भेटीत अंतर थोडं जास्त झालं की, ‘अगं, तू फोन केला नाहीस’, असं आपुलकीनं विचारणारा बाळासाहेबांचा फोन आलाच म्हणून समजायचं. एवढे मोठे व्यक्तिमत्त्व, पण व्यक्तिगत स्नेहात त्यांचं ते मोठेपण मला नव्हे तर इतरही अनेकांना कधीही जाणवलं नाही. बाळासाहेबांसारखं निर्मळ व्यक्तिमत्त्व मला वडीलधारं म्हणून लाभलं हे मी माझं भाग्यच समजते. अलीकडे ते आजारी होते तेव्हाही त्यांचा फोन आला होता. मी त्यांना भेटायलाही गेले होते. मी बराच वेळ बोलत बसले होते. निघताना मी त्यांच्या पाया पडले. बाळासाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मी त्यांना म्हटलंही की, मी पुन्हा येऊन भेटेन. दुर्दैवानं माझी ती बाळासाहेबांसोबतची शेवटचीच भेट ठरली.

कधी कधी यापुढे पुन्हा भेट होणार नाही, असं मनात येऊन जातं, मात्र नंतर वाटतं साहेब आपल्यातच आहेत की! तुमच्या-आमच्यातच आहेत. बाळासाहेब हे फक्त एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व नव्हतं तर तो एक विचार होता. मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या, या देशाच्या भल्याचा विचार. बाळासाहेबांचं निधन झाले तेव्हा मला वाटलं की, महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आता कसं होणार ? कारण ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ हे शब्द म्हणजे सर्वात मोठा धाक होता, मात्र क्षणभर मी विचार केला आणि नंतर लक्षात आलं की, बाळासाहेब ठाकरे हा विचार तर चिरंतन आहे. जसे छत्रपती शिवराय हे आजही आपल्यातच आहेत. शिवाजी महाराज हे बाळासाहेबांचं आराध्यदैवत होतं. महाराष्ट्रावर, मराठी भाषा-संस्कृतीवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं. त्यामुळे ज्या ज्यावेळी मराठी माणसावर, महाराष्ट्रावर अन्याय होईल, संकट येईल त्या त्या वेळी बाळासाहेब ठाकरे हा विचारच आपल्याला तारून नेईल. बाळासाहेबांच्या विचारांचा प्रकाश मराठी माणसाला वाट दाखवीत राहील. बाळासाहेब शरीराने जरूर कालवश झाले आहेत, पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते चिरंतन आपल्यातच राहणार आहेत.

(शब्दांकन – अतुल जोशी)