लातूर – तीन दिवसात पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण चार इसमावर कारवाई

सोशल मीडियावर तलवारी चाकू खंजर घेऊन स्वतःचे फोटो अपलोड करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. मागील तीन दिवसांमध्ये पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सोशल मीडिया द्वारे एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट दिसून आली त्यामध्ये एक इसम हातामध्ये उघडी तलवार घेऊन फोटो काढून ते फेसबुक वर पोस्ट करून त्यावर “थोडे दिवस थांबा शेठ, येणारी वेळ सांगेल की मी काय करू शकतो” असे कॅप्शन टाकून तलवारी सहित एक फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याचे दिसून आले.

त्यावर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व त्यांच्या टीमने नमूद इसमाचा शोध घेतला असता नमूद इसम हा वैशाली नगर ते बाभळगाव जाणारे रोडवर मिळून आला.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव उमेश गणेश पेंदुर (वय 27 वर्ष रा. वैशाली नगर लातूर) असे असून त्याच्याकडून फेसबुक वर तलवारी सहित पोस्ट फोटो मधील तलवार त्याच्याकडून जप्त करण्यात आली.

उमेश गणेश पेंदुर याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रवी गोंदकर यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे विवेकानंद येथे गुरन 227/2021 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा व 135 मुंबई पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास विवेकानंद पोलिस स्टेशनचे पोलीस अमलदार जागीरदार हे करत आहेत. या कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, यशपाल कांबळे यांचा सहभाग होता.

आणखीन एका प्रकरणा मध्ये पोलिसांनी कृष्णा लहू वाघमारे (20 वर्ष) आणि कृष्णा शत्रुघ्न धावारे (21 वर्ष रा. संजय नगर, लातूर) या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून एक खंजर वजा चाकू जप्त केला आहे. त्यांच्यावर पोलीस स्टेशन विवेकानंद येथेच गुरंन 225/2021 कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदवून कार्यवाही करण्यात आलेली आहे. मागील तीन दिवसात पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण चार इसमावर कार्यवाही केलेली आहे.

चाकू, तलवार, खंजर, गुप्ती यासारखे धारदार शस्त्र बाळगणे बेकायदेशीर असून असे आढळून आल्यास संबंधितावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कठोर कारवाई होऊ शकते याकरता कोणाही व्यक्तीने अशा प्रकारचा प्रयत्न करू नये असे आवाहन लातूर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या