लातूर – अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून करून मृतदेह पाण्यात फेकला, पोलिसांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कासारशिरसी ते निलंगा रस्त्यावरील तलावाच्या पाण्यात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचे पाय पोत्यात घालून त्याला दगड बांधून तलावात फेकून देण्यात आले होते.

कासार शिरसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस कर्मचारी गोरोबा चंदरराव घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, कासार शिरसी ते निलंगा रस्त्यावरील तलावाच्या पुलाच्या खाली एका महिलेचे प्रेत दिसून येत असल्याची माहिती कळवण्यात आली होती.

घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता संबंधित महिलेचे दोन्ही पाय एका पोत्यात घालून त्याला दगड बांधून मृतदेह तलावाच्या पाण्यात फेकून दिल्याचे दिसून आले. मयत महिलेचा चेहरा जलचर प्राण्यांनी कुरतडल्यामुळे ओळख पटवता आली नाही.

मयत महिलेच्या उजव्या काखेजवळ, छातीवर, डाव्या मांडीवरील कपडे जळाल्यासारखे दिसत होते. घटनास्थळीचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन शवविच्छेदन करण्यात आले व दफनविधी करण्यात आला. अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत महिलेचीही ओळख पटलेली नाही.