लातूर जिल्ह्यात 2 मध्यम आणि 16 लघू प्रकल्प अद्यापही कोरडेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. नद्या, प्रकल्प ओसंडून वाहात आहेत. लातूर जिल्ह्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. पिकांसाठी योग्य पाऊस असला तरी पाण्याची समस्या दूर होण्यासाठी लातूर जिल्ह्यात अजूनही जोरदार पावसाची गरज आहे. लातूर जिल्ह्यात आठ पैकी 2 मध्यम प्रकल्प कोरडे आहेत तर 132 लघू प्रकल्पांमपैकी 16 लघू प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत. लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्पात पाणीसाठा अजूनही म्हणावा तसा झालेला नाही. मांजरा प्रकल्पात 25 टक्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा आहे तर निम्न तेरणा प्रकल्पामध्येही अत्यल्प पाणीसाठा आहे. 3 मध्यम प्रकल्पामध्ये जोत्याखाली पाणीसाठा आहे तर 2 मध्यम प्रकल्पात 25 टक्क्यांच्या खाली पाणीसाठा आहे. केवळ एकाच प्रकल्पात 25 ते 50 टक्के पाणीसाठा आहे.

लातूर जिल्ह्यात 132 लघू प्रकल्प आहेत. त्यामधील 16 लघू प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. 46 लघू प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणीसाठा आहे. 15 लघू प्रकल्पांमध्ये 25 टक्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. 25 ते 50 टक्क्यांमध्ये असणारे 12 लघू प्रकल्प आहेत. 51 ते 75 टक्के पाणीसाठा असणारे 7लघू प्रकल्प आहेत. 75 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असणारे 14 लघू प्रकल्प आहेत. तर 100 टक्के पाणीसाठा झालेले 22 लघू प्रकल्प आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्याला जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

लातूर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 18.24 टक्के उपयुक्त पाणीसाठा
राज्यात सर्वत्र मुबलक पाणीसाठा झाला आहे. परंतू लातूर जिल्ह्यातील प्रकल्पांमधून अजूनही म्हणावा तसा उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. मांजरा प्रकल्प मृतसाठ्यामधून बाहेर पडला आहे. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांचा आणि औद्योगीक वसाहतींचा पाणीप्रश्न मिटला आहे.लातूर जिल्ह्यात सध्या केवळ 18.24 टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मांजरा प्रकल्पात 63.613 दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 16.483 दलघमी आहे. उपयुक्त पाण्याची टक्केवारी 9.31 टक्के झाली आहे. यामुळे लातूर शहरासह अनेक गावांचा आणि औद्योगीक वसाहतींचा पाणीप्रश्न मिटला आहे. निम्न तेरणा प्रकल्पात सध्या 31.581 दलघमी पाणीसाठा झालेला आहे. उपयुक्त पाणीसाठा 1.614 दलघमी झालेला आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी 1.77 टक्के एवढी आहे.

लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. तावरजा मध्यम प्रकल्पात शून्य टक्के पाणी आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात 4.312 दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. त्यात 15.48 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.व्हटी मध्यम प्रकल्प ता. रेणापूर येथे अजूनही मृतसाठ्यातच पाणी आहे. त्यामुळे तेथे उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. तिरु मध्यम प्रकल्प ता. उदगीर येथे एकूण पाणीसाठा 12.040 दलघमी आहे. या ठिकाणी उपयुक्त पाणीसाठा 26.23 टक्के आहे. देवर्जन मध्यम प्रकल्प ता. उदगीर येथे 3.266 दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यात 14.37 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. साकोळ मध्यम प्रकल्प ता. शिरुर अनंतपाळ 2.470 दलघमी पाणीसाठा झालेला आहे, उपयुक्त पाणीसाठा 6.67 टक्के झालेला आहे. घरणी मध्यम प्रकल्प ता. शिरुर अनंतपाळ येथे मृतसाठ्यामध्ये पाणी आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. त्याचप्रमाणे मसलगा मध्यम प्रकल्प ता. निलंगा येथेही शून्य टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 142 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 18.24 टक्के उपयुक्त पाणी साठा झाला आहे.