
आठवा जागतिक रंगकर्मी दिन 25 नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली येथे रात्री 8 वाजता होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची प्रमुख उपस्थिती असेल. या दिवशी कलाकार दत्तक योजनेचा प्रारंभ होणार आहे.
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत 25 नोव्हेंबरला 2014 साली यशवंत नाटय़मंदिरात मराठी कलाकार संघाच्या वतीने पहिला जागतिक रंगकर्मी दिन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या वर्षी रंगकर्मी दिन साजरा झाला नाही. रंगभूमीची ज्यांनी सेवा केली आहे, अशा रंगकर्मींची सन्मानमूर्ती म्हणून निवड केली जाते. गेल्या सात वर्षांत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, किशोर प्रधान आणि दिलीप प्रभावळकर यांची निवड केली गेली आहे. या वर्षीचे सन्मानमूर्ती अशोक सराफ आहेत.
नाटय़ कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांच्या संकल्पनेतून कलाकार दत्तक योजनेचा प्रारंभ होत आहे. रंगभूमीची ज्यांनी अनेक वर्षे सेवा केली असे काही आर्थिकदृष्टय़ा अडचणीत असलेल्या गरजू कलाकारांना दत्तक घेऊन त्यांचा भार हलका करावा म्हणून ही कलाकार दत्तक योजना आहे. या योजनेंतर्गत काही सक्षम कलाकार एक-एक व्यक्ती दत्तक घेतील.



























































