कर्नाटक निवडणुकीसाठी सीमा भागातील कर्मचाऱ्यांना सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक विधानसभेची निवडणूक 10 मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडूनही सीमा भागातील कर्मचाऱयांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील सीमेलगतच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर व नांदेड जिह्यांमध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत, मात्र त्यांची नावे कर्नाटक राज्यातील मतदार याद्यांमध्ये आहेत त्यांना मतदानासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱया सर्व उद्योग समूह, महामंडळे, संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. जर अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील, असे राज्य सरकारकडून या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.