मैदानावरचा ‘सुपरस्टार’ मैदानाबाहेर ‘देवदूत’

76

नवनाथ दांडेकर | मुंबई

जगातल्या श्रीमंत खेळाडूंमध्ये त्याचे नाव टॉपवर आहे. फुटबॉल जगताने १० वेळा त्याला ‘सर्वोत्तम फुटबॉलपटू’ किताबाने गौरवले आहे. अब्जावधी फुटबॉल शौकिनांसाठी देव ठरणारा सुपरस्टार लिओनेल मेस्सी खरेच जगातील गोरगरीब, अनाथ आणि दुःखीतांसाठी देवदूत बनलाय. ऐश्वर्य आणि संपत्तीच्या राशीत वावरणारा मेस्सी आजही सत्कार्यासाठी पुढे येण्याची दानत ठेऊन आहे. आपल्या कमाईतील करोडोंची उधळण गरीब, आजारी आणि अनाथ बालकांवर करणाऱ्या मेस्सीचे पाय आजही मातीचे आहेत. त्याच्या डोक्यात त्याने यश आणि श्रीमंतीची हवा कधीही जाऊ दिलेली नाही. यातच त्याचे महानपण दिसून आले आहे. त्याच्या या सत्कार्यांची पोचपावती म्हणून युनेस्कोने त्याला आपल्या गरिबी निर्मूलन आणि बालककल्याण मोहिमेचा ब्रँड अँबेसेडर नेमले आहे. खेळातून मिळालेल्या फावल्या वेळात मेस्सीही दुःखीतांचे अश्रू पुसण्याचे महान कार्य कसलीही जाहिरात अथवा प्रसिद्धी न करता करतोय. त्याच्या लिओनेल मेस्सी फौंडेशनने जगभरातील गोरगरिबांना करोडो डॉलर्सची मदत केली आहे.

यंदाच्या २१व्या फिफा विश्वचषकात मेस्सी सुरुवातीला अपयशी ठरल्यावर जगातील लाखो फुटबॉल शौकिनांनी त्याला टीकेचे लक्ष्य बनवले. पण मेस्सीची आई, पत्नी आणि त्याचे कुटुंबीय त्याच्या कठीण काळात त्याच्यापाठी खंबीरपणे उभे राहिले. त्याचाच परिणाम म्हणून मेस्सीने पुढच्या लढतीत यश मिळवून माजी विजेत्या अर्जेंटिनाला बादफेरीत नेण्यात यश मिळवले. गर्भश्रीमंतीत जगताना मेस्सी माणुसकी आणि समाजऋण विसरलेला नाही. भूकंपीडित असोत अनाथ मुले असोत अथवा आजारांशी झगडणारे गरीब रुग्ण असोत, या सर्वांसाठी धावण्याचे व्रतच या महान खेळाडूने घेतलेय. २००७ मध्ये मेस्सी अर्जेंटिनातील एका सार्वजानिक रुग्णालयाला भेट द्यायला गेला होता. रुग्णालयाची भीषण अवस्था आणि तेथील गरीब रुग्णांचे हाल पाहून मेस्सीच्या डोळ्यात पाणी आले. त्याचक्षणी त्याने गोरगरीब अनाथ आणि आजारी रुग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतले. रुग्णालयातील गरीब रुग्णांसाठी मेस्सीने तात्काळ ५.३ कोटी रुपये दान दिले आणि रुग्णालयाच्या डागडुजीसाठी बार्सिलोनाचे तज्ज्ञ आपल्या खर्चाने पाठवले. तेव्हापासून गोरगरिबांच्या मदतीचे सत्कार्य मेस्सी करीत आहे. त्यासाठी त्याने लिओनेल मेस्सी फौंडेशनचीही स्थापना केलीय. दहशतवाद आणि अतिरेकाने जर्जर झालेल्या सिरियाला भेट दिल्यावर तेथील उध्वस्त होणाऱ्या बालकांसाठी त्याने मदतीचे हात पुढे केला. आज त्याच्या मदतीने सिरीयात २० शाळा सुरू आहेत. इस्लामिक दहशतवादामुळे अनाथ झालेल्या १६०० मुलांची जबाबदारी या ग्रेट खेळाडूने स्वतःच्या शिरावर घेतली आहे. २०१५ मध्ये मेस्सीने युनिसेफच्या ‘ए सन फॉर द चिल्ड्रेन ऑर्गनायसेशन’ला २.५ कोटी रुपयांची मदत केली. मदतीचा धनादेश स्वतः न देता अर्जेटिनाचा नामवंत अभिनेता निको वेजक्युज याच्या हस्ते देऊन मेस्सीने वेगळा आदर्श घालून दिला आहे.

५ कोटी मुलांच्या शिक्षणासाठी मोहीम

काही कारणास्तव जी मुले शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा मुलांसाठी मेस्सीने टेनिस तारका व्हिनस विलियम्सच्यासाथीने वन इन इलेव्हन ही मोहीम सुरु केलीय. जगातील ५ कोटी गरीब मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी ही मोहीम काम करणार आहे.या मोहिमेबद्दलचा एक लघु चित्रपट ‘ला लिगा फुटबॉल’ स्पर्धेप्रसंगी फुटबॉलशौकिनांना दाखवण्यात आला होता. मेस्सी लहान असताना हार्मोनल डेफ़िसियांसी या आजाराने त्रस्त होता हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. २०१२ मध्ये मेस्सी अशाच आजाराने ग्रस्त झालेल्या एका मुलाला भेटला. या मुलाला भविष्यात फुटबॉलपटू व्हायचे होते. मेस्सीने ६ वर्षे या १२ वर्षीय मुलाच्या उपचाराचा खर्च स्वतः केला. गरीब, अनाथ आणि दुर्बल जनांचा कैवारी अशी आज सुपरस्टार मेस्सीची ख्याती आहे. पण एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये या महान तत्वाने चालणाऱ्या या सुपरस्टारला साक्षात दंडवत घालूनच प्रणाम करायला हवा एवढे त्याचे कार्य महान आहे.

आपली प्रतिक्रिया द्या