काळ आला होता पण…! दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली, पुढे जे घडलं ते थरारक होतं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काळ आला होता पण वेळ नाही… याचा प्रत्यय गुरुवारी रात्री आंबेगाव तालुक्यातील दोघांना आला. तालुक्यातील चांडोली बुद्रूक ते कळंब रस्त्यावर धरणमळा परीसरात शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने रात्री साडे दहा वाजता दुचाकीस्वारांवर हल्ला केला. मात्र दोघांनीही जिवाच्या आकांताने प्रतिकार केल्याने त्यांचा जीव वाचला. विजय गायकवाड (वय – 45) व बबन रामभाऊ थोरात (वय – 55) अशी दोघांची नावे आहेत.

विजय गायकवाड आणि बबन थोरात हे दोघे दुचाकीवरून कळंबकडे जात होते. धरणमळ्यानजीक मल्हार बंगल्याजवळ अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात बबन थोरात डाव्या हाताला जखम झाली. अचानकपणे आलेल्या प्रसंगातही प्रतिकार केल्याने त्यांचे प्राण वाचले.

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात बबन थोरात यांना जखम झाली असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनपरीक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी डॉक्टरांशी चर्चा केली असून शुक्रवारी वनपाल प्रदीप औटी व शशिकांत मडके यांनी थोरात यांची रुग्णालयात भेट देऊन विचारपूस केली.