जामखेड – साकत घाटात बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जामखेडमधील साकत घाटात बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक आणि घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. 15 दिवसांपूर्वी सौताडा परिसरात एका पर्यटकाच्या चारचाकी गाडीला बिबट्या आडवा आला होता, नंतर 8 दिवसांपूर्वी भुतवडा येथे एका शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता. यानंतर रात्री साकत घाटात बिबट्याचे दर्शन घडले. वनविभागाने ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी ‘दै. सामना’शी बोलताना केली आहे.

जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या. वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. काही दिवसांपूर्वी धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर महिन्यांपूर्वी आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.

“नागरिकांनी अंधारात एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.”

मोहन शेळके, कर्जत-जामखेड उपविभागीय वनाधिकारी