सरासरीपेक्षा पाऊस कमीच, खरिपाच्या दुबार पेरणीचे संकट

13

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठवाडा विभागात जूनअखेर १४५.८५ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या विभागात आतापर्यंत १२२.६ मि. मी. पाऊस झाला आहे. हा पडलेला पाऊसही सर्वदूर सम प्रमाणात नाही. शिवाय सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला असल्याने खरिपाची पेरणीही महिनाभरात पूर्ण होऊ शकलेली नाही.

यंदा पाऊस समाधानकारक राहील, असा अंदाज हवामान खात्याने पूर्वीच वर्तविला होता. मात्र, या अंदाजानुसार संभाजीनगर जिल्हय़ासह मराठवाडा विभागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. मराठवाडा विभागाचे पर्जन्यमान सरासरी ७७९.०० मि.मी. असून, जूनअखेर १४५.८५ मि. मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, हा अपेक्षित पाऊस अद्याप झालेला नाही, आतापर्यंत सरासरी १२२.६ मि. मी. म्हणजे २३ टक्के पाऊस झाला आहे. लातूर आणि बीड जिल्हा वगळता अन्य कुठल्याही जिल्हय़ाने जूनअखेर पडणाऱया पावसाची सरासरी ओलांडलेली नाही. बीडमध्ये १२९.३७ मि. मी. म्हणजेच सरासरीपेक्षा १.३४ मि. मी. अधिक पाऊस आहे. या तुलनेत लातूर जिल्हय़ात अधिक पाऊस झाला आहे.

या जिल्हय़ात सरासरी १४५.३१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात या जिल्हय़ात १६८.९ मि. मी. पाऊस झाला आहे. हा पाऊसही जिल्हय़ात सर्वदूर समप्रमाणात नाही. त्यामुळे औसा तालुक्यातील काही गावात अद्यापही खरीप पिकांची पेरणीही होऊ शकलेली नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा हा फटका आहे. त्यामुळे शेतकरी मोठा पाऊस कधी पडतो, याची प्रतीक्षा करीत आहेत.

संभाजीनगर, जालना मागे

मराठवाडय़ाची राजधानी संभाजीनगर जिल्हय़ाबरोबर जालन्यावर निसर्गाची वक्रदृष्टी झाली आहे. या जिल्हय़ांत अनुक्रमे १५.३ आणि १५.१ टक्केच पाऊस झाला आहे. उन्हाळय़ात सुरू झालेले टँकर्स पावसाळय़ातही सुरूच आहेत.

धरणांतही टक्का वाढला नाही

विभागात दमदार पाऊस झाला असता तर मराठवाडय़ातील धरणांत पाणीसाठा वाढल्याचे दिसून आले असते, पण पाऊस नसल्याने धरणांत केवळ ०.६९ टक्के अधिकचा पाणीसाठा झाला आहे. आजघडीला १२.४४ टक्के पाणीसाठा आहे. गत आठवडय़ात तो ११.७५ टक्के होता. विभागातील ११ मोठय़ा प्रकल्पांत किंचितही साठा वाढलेला नाही. मध्यम व लघू प्रकल्पांत थोडा पाणीसाठा वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या