गालावरच्या खळीचं रहस्य काय, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गालावर खळी डोळ्यात धुंदी ….. आजवर अशा अनेक गाण्यांमध्ये, कवितांमध्ये गालावरच्या खळीचं कौतुक आपण ऐकतो. खळीला ‘क्युट’ समजलं जातं. आलीया भट, दीपिका पदुकोन, प्रीती झिंटा, शाहरुख अशा अनेक सिने कलाकारांच्याही खळीवर लोकं घायाळ होतात. व्यक्तीच्या गालावरची खळी इतरांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरते. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काहीच लोकांच्या गालावर खळी का पडते? आपल्या गालावर का नाही पडत? म्हणूनच आजच्या लेखात जाणून घेऊया ठराविक लोकांच्याच गालावर खळी का पडते ? यामागचं रहस्य लेखक ओमकार खांडेकर यांनी ‘ब्लू पॅड’ या अॅपच्या माध्यमातून उलगडलं आहे.

गालावर पडणाऱ्या खळीवरून गेल्या काही काळात अनेक संशोधन झाले आहेत. त्या संशोधनातून समोर आलं की, प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या गालात जायगोमॅटिकस् नावाचं हाड असतं. ज्या व्यक्तीच्या गालावर खळी असते त्या व्यक्तीच्या गालामध्ये सामान्य व्यक्तीप्रमाणे हे हाड नसतं, तर ते इतरांच्या तुलनेत अगदीच लहान असतं. त्यामुळे जेव्हा या व्यक्ती हसतात तेव्हा त्यांचं हे हाड कानाच्या दिशेने ओढलं जातं आणि मध्यभागी केवळ त्वचा असल्याने तिथे खळी पडते. अनेकदा गालात असणारे हे हाड दोन भिन्न भागांत विभागले गेल्यानेदेखील गालावर खळी पडते.

काही वैज्ञानिक मात्र गालावर खळी पडण्याचं वेगळंच कारण सांगतात. वैज्ञानिकांच्या मते, ज्या लोकांच्या गालावर खळी पडते त्याचं खळी पडण्याचं कारण हे आनुवंशिक असतं. म्हणजेच त्या व्यक्तीच्या आई-वडिलांना किंवा त्याच्या आजी-आजोबांना खळी पडत असल्याने त्या व्यक्तीकडे तो गुणधर्म येतो आणि यांच्याही गालावर खळी पडते. आनुवंशिकतेमुळे घरातील एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे खळीचा हा गुणधर्म जातो.

काही लोकांच्या खळ्या गायब कशा होतात ?
संशोधनातून हेदेखील समोर आलं आहे, की ज्या लोकांच्या गालावर लहान असताना खळी असते. ती खळी व्यक्ती मोठी झाल्यानंतर नाहीशी होते. याचाच अर्थ असा की, जशी व्यक्तीची वाढ होते तसं तसं त्याच्या शरीराला आवश्यक ते गुणधर्म मिळू लागतात आणि त्यामुळे गालातील मसलदेखील भरून निघतात. याचं दुसरं कारण असंही आहे की, लहान असताना बाळाच्या गालावर बेबी फॅट असतात, पण हळूहळू हे फॅट कमी कमी होत जातात आणि खळीदेखील नाहीशी होते.

खळी केवळ गालावर नसते
अनेक लोकांना अजूनही हे माहीत नाही की खळी ही केवळ आपल्या गालावरचं नाही तर ती आपल्या हनुवटीवर किंवा ओठांच्या दोन किंवा एका बाजूलादेखील पडते. हनुवटीवर पडणारी खळी ही हनुवटीच्या मध्यभागी असते. याचं कारण असं की, जेव्हा बाळाची गर्भात वाढ होत असते तेव्हा बाळाच्या हनुवटीच्या दोन्ही बाजूची हाडं जुळत नाही आणि ती कशीबशी जुळली तर इथे एक अंतर तयार होतं त्याला हनुवटीवरची खळी असं म्हटलं जातं. ओठांच्या बाजूला पडणाऱ्या खळीचं कारण म्हणजे तिथल्या भागातील मांसपेशी या आकाराने छोट्या असतात त्यामुळे इथे खळी येते. अनेक संशोधकांच असंही मत आहे की खळ्या या केवळ आपल्या चेहऱ्यावर नाही, तर शरीरावरही ठिकठिकाणी दिसू शकतात. आपल्या मानेवर, खांद्यावर, हातावर खळी येते. आपल्या शरीरावर जिथे त्वचा मुलायम आणि आतील मांस मऊ असतं तिथे खड्डा म्हणजेच खळी पडते.

खळीचा सर्जरी फंडा 
आजकाल सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक सर्जरी करून चेहऱ्याचा कायापालट केला जातो. ज्यांना आपल्या चेहऱ्यावर खळी हवी असते ते लोक सर्जरीद्वारे आपल्या चेहऱ्यावर खळी करून घेतात, मात्र सर्जरी करणं वाटतं तितकं सोप्प असलं तरी याने अनेक त्वचारोग किंवा आपल्या चेहऱ्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे खळी मिळवण्यासाठी नको ते प्रयोग करू नये. आपलं नैसर्गिक सौंदर्य जपावे.