
आजच्या काळात स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्या विविध क्षेत्रात घर सांभाळून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. मुलगी, सून, सासू, आई, पत्नी अशी सगळी नातीही त्या करियर करून जपतात. अशा वेळी स्त्रियांशी निगडीत असे अनेक घटक आहेत त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. त्यापैकी आरोग्य हा एक घटक आहे. जर तिने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली तर ती निश्चितपणे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकते. याकरिता तिचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक महिलेने आजपासूनच सुरुवात करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया, स्त्रियांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करायला हवे.
पौष्टिक अन्नपदार्थ खा
ट्रेंडी डाएट, जंक किंवा फास्ट फूड खाण्याची आजच्या काळात तर बऱ्याच जणांना आवड असते, पण यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे महिलांनी पौष्टिक आहार घ्यावा. यामध्ये ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, ब्राऊन राईस, क्विनोआ, ओट्स, फळे इत्यादींचा आहारात समावेश करावा.
दररोज 20-30 मिनिटे चाला
शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी जिममध्ये जायलाच हवे असे नाही, तर त्याऐवजी दररोज 20 ते 30 मिनिटे चाला. जर वेळ असेल तर कार्डिओ, वेट ट्रेनिंग, होम वर्क आऊट्स इत्यादी व्यायाम प्रकार करायला हरकत नाही.
जीवनसत्त्व-खनिजयुक्त पदार्थ खा
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता आढळते. म्हणूनच नेहमी जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध अन्न खा, जेणेकरून भविष्यात कोणताही रोग होणार नाही. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फोलेट, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12, मॅग्नेशियम असलेले अन्न जास्त प्रमाणात सेवन करावे.
तणाव कमी करण्याचा प्रयत्न
स्त्रिया खूप ताण घेतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे असते. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. करियर आणि इतर अनेक जबाबदाऱ्यामुळे ताण येऊ शकतो, मात्र तणाव हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. त्यामुळे ताणतणाव घेऊ नका. समस्या कुटुंबियांशी बोलून त्यावर उपाय शोधून काढा. ताणतणाव घेतल्याने वंध्यत्व, नैराश्य, चिंता आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योगासने यांचा आधार घ्या.
भरपूर पाणी प्या
उत्तम स्वास्थ्यासाठी मुख्य उपाय म्हणजे शरीर हायड्रेट ठेवणे. यामुळे आरोग्य सुधारते. शरीराचा 60 टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. म्हणजेच शरीरातील अवयव आणि पेशींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसे पाणी आवश्यक असते. त्यामुळे पुरेसे पाणी प्या. जेणेकरून आरोग्य चांगले राहते. जास्त पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्वचेचे आरोग्य सुधारते. शरीरातील कचरा काढून टाकला जातो. जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरात सहज उपलब्ध होतात.
रात्री 7 ते 8 तास झोप
पुरेशा झोपेचा शरीराला खूप फायदा होतो, कारण तज्ञ म्हणतात की, ‘झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे’. पुरेशी झोप घेतल्याने मन आणि शरीराचा थकवा दूर होतो. महिलांबाबत अनेकदा असे दिसून येते की, अनेक वेळा घरातील काम, अभ्यास किंवा मुलांमुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि नंतर लवकर उठणे. यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. असे न करता महिलांनी किमान 7-8 तासांची झोप घेतलीच पाहिजे.
आपल्या शरीराचे म्हणणे ऐका
उत्तम आरोग्यासाठी तुमच्या शरीराचे ऐकणे केव्हाही फायदेशीर आहे. जर तुमचे शरीर खूप थकल्यासारखा सिग्नल देत असेल, त्याला पोषणाची गरज आहे, हे लक्षात घ्या. भूकेच्या वेळी न खाता फक्त काम करत राहाल, खाण्याकडे दुर्लक्ष कराल तर याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम शारीरिक ऊर्जेवरही होऊ शकतो. याकरिता शारीरिक गरजांकडे विशेष लक्ष द्या. त्याबाबत काळजी घ्या.
फायबरयुक्त पदार्थ खा
पचन, त्वचेची गुणवत्ता आणि पोटाचे आरोग्य योग्य राखण्यासाठी फायबरयुक्त अन्न खाणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आहारात फायबरयुक्त भाज्या आणि धान्याचा समावेश जरूर करा.
दरवर्षी आपल्या डॉक्टरांना भेट द्या
काही तज्ञ सुचवतात की, महिलांनी दरवर्षी त्यांच्या डॉक्टरांना भेट द्यावी आणि शरीराची तपासणी करून घ्यावी. तुमचे वय 21 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, दर 3 वर्षांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी पॅप चाचणी करा, तुमचे वय 30-65 असल्यास, तुम्ही दर 5 वर्षांनी पॅप चाचणी आणि HPV चाचणी दोन्ही करू शकता. जर तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असाल आणि एसटीडीचा उच्च धोका असेल तर, क्लॅमिडीया, गोनोरिया आणि सिफिलीससाठी दरवर्षी चाचणी घ्या. डॉक्टरांकडे जाऊन वार्षिक तपासणी करणे टाळू नका.
नेहमी आनंदी रहा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहणे खूप महत्वाचे आहे. मुलगी असो, सून असो, आई असो किंवा सासू असो, ती घरातील सदस्यांना धीर देते. त्यामुळे नेहमी आनंदी राहा आणि काही अडचण असेल तर घरच्यांना उघडपणे सांगा.



























































