
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
सिडकोने विकसित केलेल्या नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांच्या इमारतींमध्ये कॉर्पोरेट कार्यालयांना परवानगी दिली असून यातून महिन्याला लाखोंचे उत्पन्न मिळते. मात्र नेरूळ व सानपाडा स्थानकांत चक्क बार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे हार्बर लाइनला दारूची ‘झिंग’च आली आहे. याविरोधात शिवसेनेने आज आवाज उठवत रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तसेच दारूचा हा ‘झिंगझिंगाट’ तत्काळ बंद केला नाही तर आंदोलन करू असा इशारा दिला.
नवी मुंबईत कामे सुरू असलेल्या विविध रेल्वे पादचारी पुलांची आणि सीवूड रेल्वे स्थानकाची पाहणी आज खासदार राजन विचारे यांनी केली. सीवूड रेल्वे स्थानक बांधण्यासाठी सिडकोने एल ऍण्ड टी कंपनीला ठेका दिला असून या ठिकाणी मॉलला एक भूखंड दिला आहे.मात्र मॉलचे काम पूर्ण झाले असले तरी रेल्वे स्थानकाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या दिरंगाईबाबत विचारे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.यावेळी काही प्रवाशांनी सानपाडा स्थानकाच्या पूर्व बाजूला बार तर नेरुळ स्थानकाच्या पश्चिमेला प्रवेशद्वारावरच वाइन शॉप असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर संतप्त झालेल्या विचारे यांनी अधिकाऱयांची खरडपट्टी काढत कारवाई करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी मुंबई झोपडपट्टी सुधार महामंडळाचे सभापती विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, एम. के. मढवी, सिडकोचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय चौटालिया, रोहिदास पाटील, सुमित्र कडू, समीर बागवान, महेश कोटीवाले, सिद्धराम शिलवंत आदी उपस्थित होते.
पादचारी पुलावरही इंडिकेटर बसवणार
रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांवर इंडिकेटर बसविण्याच्या सूचना विचारे यांनी केल्या. त्यावर रेल्वेचे अतिरिक्त उपविभागीय व्यवस्थापक विद्याधर मालेगावकर यांनी 15 दिवसांत इंडिकेटर बसवण्याचे मान्य केले. तसेच सीवूड स्थानकात लिफ्ट व सरकते जिन्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.





























































