Lok sabha 2018 मराठा महासंघाची बैठक संपन्न, लवकरच मोठा निर्णय घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध विषयावर चर्चेसंदर्भात नगर जिल्हा मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कुणाला पाठिंबा द्यायचा? या विषयावर सखोल चर्चा होऊन, सदरचा अहवाल राज्यकार्यकारणीकडे सादर करून त्याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हा सचिवांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले हे होते. लोकसभा निवडणूकीत मराठा महासंघाची भुमिका व आगामी ध्येयधोरणे ठरविण्यासाठी नगर येथील जिल्हा सुपरवायझिंग फेडरेशनच्या कार्यालयामध्ये नगर जिल्हा व सर्व तालुका कार्यकारणी सदस्यांची बैठक घेण्यात आली होती. याप्रसंगी लोकसभा निकणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी आपल्या परिसरातील राजकीय परीस्थीती विशद केली. सर्व तालुक्यातील पदाधिकार्‍यांची मते जाणून घेऊन अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत मांडण्याचे सर्वाधिकार जिल्हा सचिव रमेशराव बोरुडे यांना देण्यात आले आहे. राज्य कार्यकारीणीच्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरविण्याचे बैठकीत ठरले. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान तरूणांवर दाखल झालेले गुन्हे घोषणा करूनही मागे घेण्यात आले नसून, तसेच दुष्काळी परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव रमेश बोरूडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर फसले, सहसचिव सुनिल चौधरी, शहराध्यक्ष अनिकेत कराळे, तालुकाध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्यासह नगर दक्षिण आणि शिर्डी मतदार संघातील सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.