Lok Sabha 2019- मेपर्यंत निवडणुका का खेचल्या? ममता बॅनर्जींनी दिले कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यापर्यंत गेल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला मे महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचं कारण बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपला अजून एक स्ट्राईक करायचा असल्याने त्यांनी निवडणूक पुढे ढकलली, असा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष अजून एक स्ट्राईक करण्याच्या विचारात आहे. मी हे नाही सांगू शकत तो स्ट्राईक कशा प्रकारचा असेल. पण तो करण्यासाठी भाजपने 19 मे पर्यंत मतदान ठेवलं आहे, असं बॅनर्जी यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, भाजपने बॅनर्जी यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जी यांना असे बिनबुडाचे आरोप करण्याची सवयच आहे, असं भाजपने म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी या मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा करणार आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या सर्वच्या सर्व 42 जागांवर विजयी होण्याचा दावा केला आहे.