
सामना प्रतिनिधी । अलिबाग
देशातील 17 व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षात तसेच देशात निवडणुकीचे वारे घुमायला सुरुवात झाली आहे. रायगड लोकसभा मतदार हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मतदार संघ मानला जात असून एक दशकापासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही हा मतदार संघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळीही रायगड लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात लढत होणार आहे.
2014 च्या लोकसभा मतदार संघातील मतदारापेक्षा 2019 मध्ये मतदारांची संख्या 1 लाखाने वाढलेली आहे. या वाढलेल्या मतांचा फायदा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदार वाढीसाठी केलेल्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात मतदार संख्या वाढण्यास मदत झाली आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात 8 लाख 3 हजार 72 पुरुष, 8 लाख 34 हजार 766 महिला, एक तृतीयपंथी, 14 एनआरआय तर 1309 सेवा मतदार असे एकूण 16 लाख 39 हजार 162 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये अजून काही मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2014 च्या तुलनेत यावर्षी एक लाख नव मतदार लोकसभेला मतदान करणार आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत 15 लाख 29 हजार 728 हजार मतदार होते. यापैकी 4 लाख 85 हजार 530 पुरुष, 5 लाख 2 हजार 212 महिला असे एकूण 9 लाख 88 हजार 152 मतदारांनी मतदान केले होते. यात शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना 3 लाख 96 हजार 178 तर सुनील तटकरे यांना 3 लाख 94 हजार 68 मते पडली होती. या निवडणुकीत तटकरे यांचा एकविसशे मताने पराभव झाला होता. इतर पक्षाच्या उमेदवाराला 1 लाख 46 हजार 847 मते पडली होती. तर बहुजन पार्टीच्या उमेदवाराला 10 हजार 510 तर अपक्ष उमेदवारांनी 19 हजार 801 मते घेतली होती.






























































