महाविकास आघाडीचे तुफान; जंगी मिरवणुकीने वैशाली दरेकर, संजय पाटील, वर्षा गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात देशात ‘इंडिया’ आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे संजय दिना पाटील तर कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर-राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी निघालेल्या मिरवणुकीत अलोट गर्दी उसळली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनीही आज ‘उत्तर मध्य’ मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘आप’, ‘सपा’सह सहयोगी घटक पक्षांचे कार्यकर्ते-पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विक्रोळी येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. या वेळी निघालेल्या मिरवणुकीला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून या सर्वांचे स्वागत करण्यात आले. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो,’ अशा गगनभेदी घोषणांनी सारा आसमंत या वेळी दुमदुमून गेला.

लोकांना आता परिवर्तन हवे आहे…

या वेळी शिवसेना आमदार सुनील राऊत म्हणाले की, लोकांना आता परिवर्तन हवे आहे. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. मोदी आता पंतप्रधान होणार नाहीत हे आता त्यांना माहीत झाले आहे. तर मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा यांनीदेखील महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर शिवसेना उपनेते सचिन अहीर म्हणाले की, आता मोदींची लाट नसून हुकूमशाही सत्ता हटवण्यासाठी जनता शिवसेना, महाविकास आघाडीलाच साथ देईल. उमेदवार संजय दिना पाटील यांनीदेखील शिवसेनेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. या वेळी शिवसेना उपनेते दत्ता दळवी, विभाग प्रमुख सुरेश पाटील, आमदार रमेश कोरगावकर, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे आदी उपस्थित होते.

ही लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ः वर्षा गायकवाड

ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी प्रचंड रॅलीनंतर वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्या बोलत होत्या. देशात एका बाजूला संविधान नष्ट करू पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि ‘आरएसएस’ आहे, तर दुसऱया बाजूला ‘इंडिया’ आघाडी, महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष असून ते संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत. संविधान विरुद्ध संघविधान या संघर्षात देशाची राज्यघटनाच विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी शिवसेना नेते अनिल परब, प्रिया दत्त, अमिन पटेल, अस्लम शेख उपस्थित होते.