Lok Sabha election 2024 : प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत?

काँग्रेसने उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीअंतर्गत आपल्या सर्व जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे; परंतु परंपरागत जागा अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघात अद्याप पक्षाला कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. रायबरेली येथून प्रियंका गांधी वाड्रा तर अमेठीतून राहुल गांधी लढतील अशी शक्यता होती; परंतु आता प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, असे सूत्रांच्या हवाल्याने कळते आहे.

प्रियंका गांधी यांच्या निवडणूक न लढण्याच्या निर्णयावर काँग्रेस पक्षानेही सहमती दर्शवल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. तर राहुल गांधी यांच्या अमेठीतून लढण्यावर अद्याप कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रियंका गांधी निवडणूक प्रचारात संपूर्ण ताकदीने उतरणार आहेत; परंतु निवडणूक लढणार नाहीत असे सूत्रांनी म्हटले आहे. राहुल गांधी अमेठीतून लढणार की नाहीत याबाबत बुधवारपर्यंत पक्ष निर्णय घेणार आहे. उमेदवारांची घोषणा करण्याआधी संबंधित उमेदवार अयोध्या मंदिरात जाणार असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु, यावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा जवळपास 55 हजार मतांनी पराभव केला होता.