आधी लगावले ठोसे मग घेतली कोलांटी उडी, विजेंदर सिंहची काँग्रेससोबत दगाबाजी

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आता राजकीय पटलावर घडामोडींना वेग आला आहे. पण, एखाद्या खेळातही पाहायला मिळणार नाही अशी राजकीय कोलांटीउडी बॉक्सर विजेंदर सिंह याने घेतली आहे. अवघ्या काही तासांत आपली राजकीय भूमिका बदलत काँग्रेसला दगा दिलेल्या विजेंदरला आता ट्रोल केलं जात आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात राहुल यांनी लिहिलं होतं की, आज मला एका तरुणाने हा व्हिडीओ पाठवला. आता भीती आणि भ्रम यांचं जाळं भेदून सत्य समोर येताना दिसत आहे. आता प्रोपोगंडा पसरवणाऱ्यांचं काहीही चालणार नाही, कारण लोकच त्यांना आरसा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत, असं राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्या पोस्टला अवघ्या काही तासांपूर्वी विजेंदर सिंह याने रिट्विट केलं होतं.

विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये असताना विजेंदरने भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल चालवला होता. शेतकऱ्यांचं दिल्लीतील आंदोलन तसंच महिला पैलवानांनी छेडलेल्या आंदोलनाला विजेंदरने पाठिंबा देत भाजपवर टीकाही केली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या एक्सपोस्टवरील व्हिडीओ रिट्विट केल्यानंतर अवघ्या काही तासात विजेंदरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्यामुळे आधी भाजपला शाब्दिक ठोसे लगावणाऱ्या विजेंदरने घेतलेली ही कोलांटी उडी पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केलं आहे. वास्तविक 2023मध्ये त्याने राजकीय संन्यास घेत असल्याचे संकेतही दिले होते. पण, त्यानंतर त्याने पुन्हा राजकीय क्षेत्रात सक्रिय व्हायचा निर्णय घेतला होता.