
सामना प्रतिनिधी, मुंबई
मंत्री, आमदारांपासून कर्मचारी व सरकारी कामानिमित्त मंत्रालयात येणाऱयांचे उदरभरण करणाऱया कँटीन कर्मचाऱयांचा लूक आता बदलण्यात येणार आहे. या कँटीनमधील चतर्थश्रेणी कर्मचाऱयापासून व्यवस्थापकाला पदानुसार गणवेश देण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. नवीन रंगातील गणवेश व नवीन बूट अशा नव्या लूकमध्ये कँटीन कर्मचारी दिसतील.
मंत्रालय उपाहारगृह, चौरस आहार उपाहारगृह, विधान भवन उपाहारगृह, तसेच कोकण भवन उपाहारगृह ही चार कँटीन सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत आहेत. या कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून गणवेश तसेच चामडय़ाचे बूटही दिले जातात. मंत्रालयात तसेच विधान भवनात असणारे कर्मचारी-अधिकारी व अभ्यागतांना खाद्यपदार्थ पुरवण्याचे काम हे कँटीन कर्मचारी करतात. या सर्वांना सरकारकडून गणवेश देण्यात येतो. आता त्यांना नवीन प्रकारचे गणवेश देण्यात येतील.
पदानुसार या गणवेशाचे रंगदेखील वेगळे असतील. वेगळय़ा रंगाचे गणवेश दिल्यास त्यांना ओळखणे सोयीचे होईल आणि सुसंगतीदेखील निर्माण होईल ही यामागील कल्पना आहे. चतुर्थश्रेणीतील महिला कर्मचाऱ्याला दर दोन वर्षांतून एकदा पाच साड्या, पुरुष कर्मचाऱ्यांना चार पॅण्ट व चार शर्ट शिलाईसह देण्यात येतील. पुरुष तसेच स्त्री कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 जोडी स्पोर्टस् शूज व चार मोजे तर मोरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जोडी गमबूट देण्यात येतील. कँटीनमधील सहायक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक पदावरील कर्मचाऱ्यांनाही गणवेश देण्यात येणार आहेत.

























































