
>> विशाल अहिरराव
हरिश्चंद्र गडावर तारामती शिखर आणि बालेकिल्ला यांच्यात हत्ती महाल हा परिसर आहे. या परिसरात खालच्या भागात एक मानवनिर्मित गुहा अनेक शतकांपासून बुजलेली होती. निसर्गप्रेमी, गिर्यारोहक विनायक वाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेत ही गुहा सर्वांसाठी खुली केली आहे. त्यामुळे ही गुहा आता ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरेल. सोबतच ट्रेकर्सची संख्या वाढल्याने आसपासच्या गावकऱयांच्या उत्पन्नात वाढही होईल.
‘हरिश्चंद्र गडावर तारामती शिखर आणि बालेकिल्ला यांच्यात हत्ती महाल हा परिसर आहे. या ठिकाणी कातीव दगडामध्ये बांधलेले एक छोटेसे मंदिर आहे, ज्याची खूपच पडझड झालेली आहे. त्याच्या खालच्या भागात एक मानवनिर्मित खोदलेली गुहा आहे. ही गुहा पूर्णपणे बुजून गेलेली होती. या गुहेत प्रवेश करता येणं केवळ अशक्य होतं. म्हणून या गुहेच्या बाहेरील, प्रवेशद्वारातील आणि आतील माती बाहेर काढून, या गुहेत प्रवेश करणं, हे आमच्या मोहिमेचे स्वरूप होतं’, अशी माहिती वाडेकर यांनी दिली. 6 फेब्रुवारीला तब्बल पाच तासांच्या मेहनतीनंतर या गुहेतून मातीचे ढिगारे बाहेर काढण्यात आले. आता कोणालाही आत जाऊन ही गुहा बघता येईल.
या गुहेची लांबीरुंदी सात फूट बाय सात फूट आणि उंची साधारण सात फूट आहे. या गुहेच्या बाहेरच्या भागात पाण्याचे एक टाके आहे. ही गुहा आता ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरेल. या मोहिमेमध्ये वाडेकर यांच्यासोबत संगमनेरचे गोरख गाडे, रवी राऊत, आदिवासी मित्र संजय, विठ्ठल, संतोष, भास्कर बादड, बाळू बांबळे हे सहभागी झाले होते.

































































