
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाटोपाट आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे प्रवाशांसाठी एअरपोर्टच्या धर्तीवर आलिशान प्रतिक्षागृह बनविण्यात आले आहे. या प्रतिक्षागृहात प्रति प्रवासी अवघ्या दहा रूपयांत वातानुकूलित दालनात आराम करता येणार आहे. तर साध्या दालनात पुरूष व महिला प्रवाशांना मोफत थांबता येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने लोकमान्य टिळक टर्मिनसच्या वेटींग रूमचे नूतनीकरण,संचालन, देखभाल आणि हस्तांतर अशा ‘पीपीपी’तत्वांवर पाच वर्षांकरीता सुमारे 60 कोटीचे कंत्राट काढले आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना एअरपोर्टसारख्या सोयीसुविधा मिळणे शक्य होणार आहे. या चकाचक प्रतिक्षागृहामुळे रेल्वेची दरवर्षी 20 लाख रूपये अशी पाच वर्षांत एक कोटी रूपयांची बचत होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी दिली आहे.
काय सुविधा असणार
– सोफा सिटींग, कॅफे सिटींग,
– वेंटिग रूमच्या आत कॅटरिंगची सुविधा
– टॉयलेट व बाथ, गरम पाण्याची सोय
– लगेज सांभाळून ठेवण्याची व्यवस्था
– मोबाईल चार्जिंगचे पॉईंट
– अत्यंत आरामदायी खुर्च्या


























































