
अखेर आयपीएलमध्ये पावसाने पहिल्या विजयाची नोंद केली. त्यामुळे रद्द झालेल्या सामन्यात लखनौ आणि चेन्नईला प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आले. पावसामुळे खेळ थांबण्याआधी पुन्हा एकदा लखनौची अवस्था दोन दिवसांपूर्वी बंगळुरूविरुद्ध जशी झाली, तशीच झाली होती. पावसाचे संकट असलेल्या या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांपुढे लखनौचे फलंदाज ढेपाळले. मोईन खान, महीश तीक्ष्ण आणि रवींद्र जाडेजा यांच्या फिरकीने लखनौचा अर्धा संघ गुंडाळत 10 षटकांत 5 बाद 44 अशी केविलवाणी अवस्था केली होती. त्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा धावा वाढतच नव्हत्या. 14 षटकांत 62 धावांवर अडकलेल्या लखनौच्या डावाला 15 व्या षटकापासून गती लाभली.
पूरन आणि बदोनीने 59 धावांची भागी रचत संघाला शतक ओलांडून दिले. पण बदोनीने 19 व्या षटकांत दीपक चहरच्या गोलंदाजीवर 2 षटकार आणि एक चौकार ठोकत 20 धावा वसूल केल्या. 23 वर्षीय बदोनीने आपले आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक 30 व्या चेंडूवर साजरे केले. लखनौचा डाव संपायला 4 चेंडू शिल्लक असताना पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला. बदोनी 59 धावांच्या खेळीत 4 षटकार आणि 2 चौकार ठोकले. चेन्नईच्या मोईन, जाडेजा आणि तीक्ष्णने अचूक मारा करत प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.
एक गुण घोळ घालणार
यंदा आयपीएलमध्ये पाच संघ 10 गुणांसह एका रेषेत धावत होते. त्यातच लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण विभागून देण्यात आला आहे आणि हा एक गुणच या संघांना महागात पडण्याची शक्यता आहे. जर आज एक संघ जिंकला असता तर तो अव्वल स्थानाच्या शर्यतीत असता, पण आता तसेच होणार नाही. पुढील चारपैकी एकाही लढतीत ते हरले तर त्यांचे टॉप थ्रीमध्ये पोहोचण्याची संधी कमी होण्याची शक्यता अधिक आहे.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंटस् – 19. 2षटकांत 7 बाद 125 ( निकोलस पूरन 20, आयुष बदोनी ना. 59 , मोईन अली 4-0-13-2, महीश तीक्ष्ण 4-0-37-2, मथीशा पथिराणा 3-2-0-22-2)




























































