
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काही वेळा खेळामध्ये संघासाठी कटू निर्णय घ्यावे लागतात, मात्र खेळाडूंनी त्याचे वाईट वाटून घ्यायचे नसते. रमेश पोवार हा मितालीचा शत्रू नाहीय. त्यामुळे मितालीने चिखलफेक करण्याऐवजी स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला हिंदुस्थानचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदनलाल यांनी मितालीला दिला आहे. मदनलाल ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलत होते.
विंडीजमधील महिला विश्वचषकात उपांत्य फेरीत हिंदुस्थानी महिला संघाला इंग्लंडकडून मोठय़ा पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात मिताली राजला संघात जागा देण्यात आली नव्हती. सामना संपल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने विनिंग कॉम्बिनेशन बिघडवायचे नसल्यामुळे मितालीला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर काही दिवसांनी मिताली राजने बीसीसीआयला पत्र लिहीत प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडुल्जी यांच्यावर आरोप केले होते. याचसोबत रमेश पोवार यांनी आपला छळ केल्याचंही मितालीने आपल्या पत्रात म्हटले होते.
सारखे प्रशिक्षक बदलणे चांगली गोष्ट नाही
मदनलाल यांनी रमेश पोवारची पाठराखण केली. ते म्हणाले, प्रशिक्षकांना सारखे बदलत राहणे संघासाठी चांगली गोष्ट नाही. असे करायचेच असेल तर त्या जागेवर एक ठोकळा आणून ठेवा जो खेळाडूंनी सांगितलेली गोष्ट ऐकेल. प्रशिक्षक हा संघाचा महत्त्वाचा हिस्सा असतो व त्याने घेतलेले निर्णय सर्व संघ सहकाऱयांना बंधनकारक असतात. पोवार यांनाही आपला संघ जिंकावा असेच वाटत असणार. मग या प्रकरणानंतर त्यांनाच लक्ष्य का केले जात आहे? निवड समितीचे सदस्यही या निर्णयाचा हिस्सा असणार. मग त्यांना कोणी जाब विचारायचा? असा सवाल मदनलाल यांनी शेवटी केला.






























































