पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपमध्ये लढत; 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेगवान घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अनपेक्षितपणे पारनेर बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार नीलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस 13 तर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) 5 जागा असे जागावाटप निश्चित करण्यात आले. गेली तीन वर्षे विविध कारणांनी एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना या निर्णयामुळे धक्का बसला असला तरी खासदार डॉ.सुजय विखे यांचा तालुक्याच्या राजकारणातील अवाजवी हस्तक्षेप रोखण्यासाठी माजी आमदार औटी यांनी आमदार लंके यांच्याशी जुळवून घेत महाविकास आघाडीची मोट बांधली.त्यासाठी फारसे आढेवेढे न घेता माजी आमदार औटी यांनी 18 पैकी अवघ्या पाच जागावर समाधान मानले.

बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय जनता पक्षाची युती होईल अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली गेली होती.दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा विशेषतः इच्छूक उमेदवारांचा तसा आग्रह होता.मात्र माजी आमदार औटी यांचा भाजप बरोबर युती करण्यास विरोध होता.तालुक्यातील संस्थांमध्ये बाहेरच्या व्यक्तीचा समावेश नको अशी भूमिका माजी आमदार औटी यांनी घेतल्याने बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांनी उध्दव ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा असणाऱ्या शिवसैनिकांना बाजार समिती निवडणुकीत संधी देण्याचे सूतोवाच केले होते.सुरूवातीला शिवसेनेकडून आमदार लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही.मात्र अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीची मोट बांधण्यात यश आले.

महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ:- प्रशांत गायकवाड, अशोक सावंत,आबासाहेब खोडदे,बाबासाहेब तरटे, संदीप सालके,रामदास भोसले, किसन सुपेकर.महिला राखीव:-पद्मजा पठारे,मेघा रोकडे.इतर मागासवर्गीय:-गंगाराम बेलकर, विमुक्त जाती जमाती:-बाबासाहेब न-हे, ग्रामपंचायत मतदारसंघ:-विजय पवार,किसनराव रासकर‌.आर्थिक दुर्बल घटक:-भाऊसाहेब शिर्के. अनुसुचीत जाती जमाती:-शंकर नगरे.व्यापारी,आडते मतदारसंघ:-अशोकलाल कटारिया,चंदन भळगट‌. हमाल मापाडी मतदारसंघ:-तुकाराम चव्हाण.

भारतीय जनता पक्ष प्रणित जनसेवा मंडळाचे उमेदवार
सेवा सहकारी संस्था मतदार संघ:-सुरेश पठारे,दिलीप मदगे,स्वप्निल मावळे,गंगाधर रोहोकले,अरुण ठाणगे,संतोष आंधळे, प्रकाश ठाणगे.महिला राखीव:-संध्या काळे,सीताबाई गायकवाड. इतर मागास वर्गीय:-रामदास रसाळ.विमुक्त जाती,जमाती:-स्वप्निल राहिंज.ग्रामपंचायत मतदार संघ:-लहु भालेकर,शिवाजी खिलारी,आर्थिक दुर्बल घटक:-पंकज कारखिले.अनुसुचित जाती,जमाती:-अमोल साळवे.व्यापारी,आडते मतदारसंघ:-अशोक चेडे,दत्तू पुजारी.हमाल, मापाडी मतदारसंघ:-संदिप कावरे.