संस्कृतायन – कालिदासाचा आदर्श राजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समिरा गुजर जोशी
[email protected]

महाकवी कालिदासाच्या रघुवंश या महाकाव्याच्या आरंभी रघुकुलातील राजांचे जे वर्णन येते, ते वाचताना नेमके हेच जाणवते. ही केवळ एका महान राजवंशाची स्तुती नाही; माणसाने आपले कर्तृत्व, संपत्ती, सत्ता आणि अखेर संपूर्ण आयुष्य कसे जगावे, याचे जणू सूत्रच कालिदास सांगतो.

राजा कसा असावा? पराक्रमी, सामर्थ्यवान, प्रजेला सांभाळणारा अशी अनेक उत्तरे आपल्याला सुचतील, पण आदर्श राजा होण्यासाठी आधी आदर्श माणूस असणे आवश्यक आहे, असे म्हटले तर? महाकवी कालिदासाच्या रघुवंश या महाकाव्याच्या आरंभी रघुकुलातील राजांचे जे वर्णन येते, ते वाचताना नेमके हेच जाणवते. ही केवळ एका महान राजवंशाची स्तुती नाही; माणसाने आपले कर्तृत्व, संपत्ती, सत्ता आणि अखेर संपूर्ण आयुष्य कसे जगावे, याचे जणू सूत्रच कालिदास सांगतो.

‘आजन्मशुद्धानामाफलोदयकर्मणाम्’ असे रघुवंशीयांचे वर्णन करताना कालिदास सर्वप्रथम त्यांच्या शुद्ध आचरणाचा आणि कार्यनिष्ठेचा उल्लेख करतो. त्यांनी एखादे कार्य हाती घेतले की, ते फळाला येईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला. आपल्या आयुष्यातही अनेक गोष्टी आपण मोठय़ा उत्साहाने सुरू करतो. नवा अभ्यासक्रम असो, व्यायामाचा संकल्प असो, एखादा व्यवसाय असो किंवा एखादी कलाकृती सुरुवातीचा उत्साह टिकवून ती गोष्ट पूर्णत्वाला नेणे मात्र कठीण असते. रघुकुलाचा पहिला आदर्श म्हणून कालिदास नेमकी ही चिकाटी अधोरेखित करतो. पुढे तो म्हणतो-

यथाविधिहुताग्नीनां यथाकामार्चितार्थिनाम्।
यथापराधदण्डानां यथाकालप्रबोधिनाम्।।

या एका श्लोकात प्रमाणबद्धतेचे सुंदर तत्त्व आहे. यज्ञ करायचा तर विधीपूर्वक, याचकाला द्यायचे तर त्याच्या अपेक्षेनुसार, अपराध्याला शिक्षा करायची तर अपराधाच्या प्रमाणात आणि उठायचे तर योग्य वेळी! यातला ‘यथापराधदण्डानाम्’ हा विचार आजही किती महत्त्वाचा आहे! घरात मुलाची एखादी चूक झाली तरी कधी आपण त्या चुकीपेक्षा मोठी प्रतिक्रिया देतो. कार्यालयात एखाद्या सहकाऱयाच्या एका चुकीवरून त्याच्या संपूर्ण क्षमतेविषयी मत बनवतो. कालिदासाचा राजा मात्र न्याय करताना भावनेच्या भरात जात नाही. चूक जितकी, शिक्षा तितकी-सत्ता असूनही संयम राखणे हाच खरा न्याय. यानंतरचा श्लोक तर रघुकुलाच्या जीवनदृष्टीचा गाभाच आहे.

त्यागाय संभृतार्थानां सत्याय मितभाषिणाम्।
यशसे विजिगीषूणां प्रजायै गृहमेधिनाम्।।

ते संपत्ती मिळवत, पण त्यागासाठी. मोजके बोलत, पण सत्य बोलण्यासाठी. विजयाची इच्छा बाळगत, पण कीर्तीसाठी. गृहस्थाश्रम स्वीकारत, पण वंश पुढे नेण्याच्या जबाबदारीसाठी.

किती सुंदर आहे हा विचार! पैसा कमावणे चुकीचे नाही, महत्त्वाकांक्षा असणेही चुकीचे नाही. प्रश्न आहे- कशासाठी? आपण कमावलेल्या पैशांतून आपल्या कुटुंबाबरोबरच गरजू व्यक्तीला मदत करता आली, आपल्या यशामुळे दुसऱयाला एखादी संधी देता आली, तर त्या संपत्तीला व्यापक अर्थ मिळतो. तसेच आज सतत व्यक्त होण्याच्या काळात ‘सत्याय मितभाषिणाम्’ अधिकच महत्त्वाचे वाटते. प्रत्येक विषयावर बोलण्यापेक्षा आवश्यक तेवढे आणि सत्य बोलणे हीसुद्धा एक साधना आहे आणि मग कालिदास राजेपणाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवी आयुष्याचेच चित्र रेखाटतो-

शैशवे भ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्।
वार्धके मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।

बालपण विद्याभ्यासात, तारुण्य उचित सुखोपभोगात, वार्धक्य मुनिवृत्तीने आणि अखेरीस योगमार्गाने देहत्याग. प्रत्येक वयाचे एक प्रयोजन आहे. कालिदासाचा आदर्श जीवनातील कोणताही टप्पा नाकारत नाही. शिकण्याचे वय मनापासून शिकावे, संसाराचे वय आनंदाने जगावे आणि योग्य वेळी आसक्ती कमी करून अंतर्मुखही व्हावे. इतक्या महान वंशाचे वर्णन करायला निघालेला कालिदास स्वत मात्र नम्रपणे म्हणतो- ‘रघूणामन्वयं वक्ष्ये तनुवाग्विभवो?पि सन्’ – माझ्या वाणीचे सामर्थ्य मर्यादित असले तरी या रघूंचे गुण कानावर पडले आणि त्यांच्या वर्णनाचे धाडस मी करीत आहे. कदाचित इथेच रघुकुलाच्या महिम्याचे महत्त्वाचे सूत्रही सापडते. सामर्थ्य असावे, पण त्याला शुद्ध आचरणाची जोड असावी. संपत्ती असावी, पण त्यागासाठी. सत्ता असावी, पण न्यायासाठी. वाणी असावी, पण सत्यासाठी आणि कर्तृत्व कितीही मोठे झाले तरी मनात नम्रता असावी. कालिदासाने रेखाटलेला हा आदर्श राजाचा आहे खरा, पण त्यासाठी राजसिंहासनाची गरज कुठे आहे? आपल्या छोटय़ाशा कार्यक्षेत्रात, कुटुंबात आणि समाजात ही मूल्ये जपता आली तर रघुकुलाचा हा आदर्श आपल्या जगण्याचा आदर्श होऊ शकतो.

कालिदासाच्या या वर्णनातून त्याची जीवनदृष्टीही स्पष्ट होते. सामर्थ्य आणि वैभवापेक्षा नीतिमत्ता, संयम, कर्तव्यनिष्ठा आणि सदाचार यांना त्याच्या मूल्यव्यवस्थेत अधिक महत्त्व आहे. म्हणूनच हे विचार केवळ तत्कालीन राजधर्मापुरते मर्यादित न राहता आजही तितकेच अर्थपूर्ण वाटतात. पुढे रघुवंशात कालिदास सदाचारी, कर्तव्यनिष्ठ राजांबरोबरच मूल्यांपासून दूर गेलेल्या राजांचीही चित्रे उभी करतो. त्या विविध व्यक्तिरेखांतून अखेरीस एकच गोष्ट अधोरेखित होते- सत्ता माणसाला मोठे करत नाही, ती कशी वापरली जाते, यावर त्याचे मोठेपण ठरते.

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत.)