शनिशिंगणापूर देवस्थान सरकारच्या नियंत्रणाखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

शनि शिंगणापूर येथील शनैश्वर मंदिर प्रशासनाच्या कारभारावरून निर्माण झालेल्या वादानंतर राज्य सरकारने आता पंढरपूर, शिर्डी व अन्य देवस्थानांप्रमाणे हे मंदिरही आपल्या नियंत्रणाखाली आणले आहे. अन्य देवस्थानांप्रमाणे स्वतंत्र कायदा करून शनैश्वर मंदिरात विश्वस्त मंडळ नेमण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आगामी नागपूर पावसाळी अधिवेशनात याबाबतचे विधेयक विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे.

शिर्डीजवळ असलेल्या श्री शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. वाढत्या गर्दीचा विचार करून या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक होते. तसेच पूर्वीच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या अनियमितता व गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी होत्या. नव्याने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेबाबतही अनेक आक्षेप घेण्यात आले होते. याशिवाय मध्यंतरी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे अस्तित्वातील सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करून नवीन अधिनियमान्वये शनैश्वर देवस्थान राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.