ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; महाराष्ट्र दिनाची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मेट्रो रेल्वेमधून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना आता 25 टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे, महाराष्ट्र दिनापासून मेट्रो प्रवास भाडय़ातील सवलत लागू होईल. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही घोषणा केली. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रीप किंवा 60 ट्रीपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे.

कोणाला सवलत मिळेल?
ही सुविधा 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, इयत्ता बारावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या तीन श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन), सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत. या सर्व सवलती मेट्रो लाइन 2 ए आणि 7 च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवरदेखील सवलत असेल तसेच याला 30 दिवसांची वैधता राहील. मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते आणि रिचार्जही करता येईल.