
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 4082 सदनिकांच्या विक्रीकरिता 14 ऑगस्ट रोजी काढलेल्या संगणकीय सोडतीतील कर्ज प्रक्रियेत विलंब झालेल्या यशस्वी अर्जदारांना दिलासा देणारा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयामुळे सदनिकेकरिता पहिल्या टप्प्यातील रकमेचा भरणा केलेल्या 235 लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्याच निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांनी वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज मिळणे व तद्अनुषंगिक कारणांमुळे विलंब होत असल्यामुळे सवलत मिळण्याबाबत म्हाडाकडे निवेदन सादर केले होते. अनेक लाभार्थ्यांकडून प्राप्त निवेदनावर विचार करून सदनिकेची उर्वरित रक्कम भरण्याकरिता 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी बुधवारी जाहीर केला आहे.



























































