
राज्यात जुलैमध्ये पर्दाफाश केलेल्या इसिस मॉडय़ुल प्रकरणात एनआयएने गुरुवारी विशेष सत्र न्यायालयात 6 मुख्य आरोपींविरुद्ध 400 पानी आरोपपत्र दाखल केले. हे आरोपी इसिसचा हिंदुस्थानविरोधी हिंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करीत होते, असा दावा एनआयएने केला आहे. इसिसने हिंदुस्थानविरुद्ध रचलेल्या दहशतवादी कट-कारस्थानांचा गौप्यस्फोट आरोपपत्रातून करण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर एनआयएने आरोपपत्र दाखल केले. यात 16 संरक्षित साक्षीदारांची नावे आहेत. ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लालाभाई, शर्जील शेख, बोरिवली-पडघा येथील आकीफ अतीक नाचन, जुबेर नूर मोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसैबा आणि पुण्यातील डॉ. अदनानली सरकार या सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. जागतिक पातळीवर दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय असलेली संघटना इसिसमध्ये भरती तसेच या संघटनेला पैसा पुरवण्यासाठी या आरोपींनी सहभाग घेतला. ताबिश व झुल्फिकार या दोघांनी इसिसच्या स्वयंभू खलिफाशी शपथ घेतली होती, असे खुलासे करीत एनआयएने बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायदा व भादंवि कलमांखाली आरोपपत्र दाखल केले आहे. झुल्फिकार अली बडोदावाला व आकीफ अतीक नाचनविरुद्ध यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आयईडी बनवल्याबद्दल पुणे मॉडय़ुल प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते.
आरोपपत्रातील खुलासे
– एनआयएने आरोपींच्या घरांमधील झडतीत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, इसिसशी संबंधित दस्तऐवज व इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. त्याचबरोबर अनेक भडकावू सोशल मीडिया पोस्टदेखील आढळल्या आहेत.
– जप्त केलेल्या साहित्यातून आरोपींचे इसिसशी असलेले मजबूत व सक्रिय संबंध तसेच दहशतवादी संघटनेचा हिंदुस्थानविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न उघड झाले आहेत.
दहशतवादविरोधी फास आणखी घट्ट
एनआयएने जुलैपासून दहशतवादविरोधी कारवाईचा फास आणखी घट्ट केला आहे. राज्याच्या विविध भागांतून इसिसशी संबंधित अनेक आरोपींना अटक केली आहे. 3 जुलैला मुंबईतून तबिश नासेर सिद्दिकी, अबू नुसैबा, शरजील शेख व झुल्फिकार अली बडोदावाला तसेच 18 जुलैला पुण्यातून महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकीला ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ डॉ. अदनानली सरकारला अटक केली. या छापेमारीनंतर दोन आरोपपत्र दाखल केली आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीलाही इसिसचा मोठा कट उधळण्यात आला.
– टेरर मॉडय़ुल प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी इसिसच्या इशाऱ्यावरून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा तसेच देशाची धर्मनिरपेक्ष आचारसंहिता, संस्कृती आणि लोकशाहीला धोका निर्माण करण्याचा कट रचला होता, असा धक्कादायक खुलासा आरोपपत्रात करण्यात आला आहे.





























































